औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या बाजूला साठविण्यात आलेल्या कच-याला रविवारी सायंकाळी अचानक आग लागण्याची घटना घडली. यात कचरा साठविलेला एक कक्षही जळून खाक झाला. आगीच्या घटनेमुळे विभागातील रुग्ण, नातेवाईकांची धावपळ झाली.
शहरातील कचराकोंडीमुळे महापालिकेने घाटीतील कचरा उचलणे बंद केला. घाटी प्रशासनाने वारंवार विनंती करूनही महापालिकेकडून कचरा उचलण्यात आला नाही. त्यामुळे घाटी रुग्णालयातील मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या बाजूला आणि शवविच्छेदनगृहाच्या पाठीमागील जागेतच कचरा डेपो तयार करण्यात आला. परिसरात कच-याचे ढीग साचले आहेत. याठिकाणी काळ्या, निळ्या पिशव्यांबरोबर लाल पिशव्यांमध्ये संकलित केलेला कचरा साठविला जातो. त्यामुळे कच-यामुळे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना प्रचंड दुगंधीर्चा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची ओरड केली जात असताना रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमाराला येथे आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची एकच धावपळ उडाली. शवागृहाला लागुन असलेल्या मागच्या एका खोलीतही कचरा साचलेला होता. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले. बाजूलाच शेचारीच रेकॉर्ड रुम आणि मूत्रपिंड विकार विभाग आहे. धुरामुळे मूत्रपिंड विभागातील रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ झाली. आग विझविण्यासाठी एमआरआय, सीव्हीटीएस विभागातील नातेवाईकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. रुग्णवाहिकांचे चालक, कर्मचारी आणि अग्निशमन विभागाच्या मदतीने आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
शेजारी रेकॉर्ड रुमआग लागलेल्या ठिकाणाच्या शेजारीच रेकॉर्ड रुम आहे. रेकॉर्ड रुम हलविण्याचे काम सध्या सुरु आहे. तरीही सध्या घाटीतील अनेक महत्वपूर्ण रेकॉर्ड याठिकाणी आहे. सुदैवाने रेकॉर्ड रुमला काहीही झालेले नसल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांनी सांगितले.