औरंगाबाद : दोन वर्षांपूर्वी शहरातील फटाका मार्के ट आगीत भस्मसात झाले होते, त्यामुळे गतवर्षी फटाका मार्केटला शहरात परवानगी देण्यात आली नव्हती. त्याचप्रमाणे यावर्षीही नागरिकांच्या सुरक्षेसाठी फटाका मार्केटला शहराबाहेरच परवानगी देण्यात येईल, असे स्पष्टीकरण पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिले.
चार दिवसांपूर्वी शहरातील फटाका मार्केट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. याविषयी बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले की, आपण पूर्णपणे फटाक्याच्या विरोधात आहोत. फटाक्याच्या रूपाने पैसे जाळण्याचाच प्रकार आहे. फटाक्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होते. रूढीपरंपरेप्रमाणे आपण दिवाळीत फटाके फोडतो. आता केवळ शोभेचे आणि विना आवाजाचे फटाके फोडायला हवेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या फटाका मार्केटच्या आगीच्या घटनेमुळे नागरी वसाहतीत आता फटाक्यांच्या दुकानांना परवानगी दिली जाणार नाही. टी.व्ही. सेंटर येथील जागा फटाका दुकानांसाठी सुरक्षित आहे का, याबाबतची तपासणी केल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.
डीजेने काय साध्य होतेपोलीस आयुक्त म्हणाले की, गणेशोत्सवात डीजे वाजविण्यास परवानगी दिल्यास सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होऊ शकतो, यामुळे गणेशोत्सवात डीजेला परवानगी नाही. डीजेचा आवाज एवढा मोठा असतो की, कर्तव्यावरील पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही दिलेले आदेश ऐकायला येत नाहीत. एवढेच नव्हे, तर मोबाईल आणि वायरलेसवरील संदेशही समोरच्या अधिकाऱ्यांना ऐकायला येत नाही. डीजेमुळे सुरक्षा व्यवस्था कोलमडून जाते. आता गणेश महासंघांनीही पुढाकार घेऊन डीजेचा वापर कायमस्वरूपी बंद करण्यास सांगायला हवे.
बुढीलेनमध्ये तलवारी काढणाऱ्यांना लवकरच अटकतीन दिवसांपूर्वी बुढीलेनमध्ये रिक्षाचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या भांडणानंतर तलवारी, लाठ्या-काठ्या बाहेर काढण्यात आल्या होत्या. यामुळे तेथे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने त्यादिवशी परिस्थिती नियंत्रणात आली. तलवारी काढणाऱ्या आरोपींची नावे आम्ही निष्पन्न केली असून, लवकरच त्यांना अटक केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही अत्यंत गंभीरपणे कोम्बिंग आॅपरेशन राबवत आहोत.
गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न चोऱ्या, घरफोड्या उघडकीस आणण्यात आम्हाला म्हणावे तसे यश आले नाही; मात्र गुन्हे उघडकीस आणून शिक्षेचे प्रमाण वाढावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.