औरंगाबाद: जमीन खरेदी व्यवहाराच्या वादातून एकाला बळजबरीने आधी दारू पाजली. त्यानंतर विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रेणुकामाता मंदिरासमोरील मोकळ्या मैदानावर ३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता घडली. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने सातारा पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
सुधीर सदावर्ते (३२), साहिल सदावर्ते आणि अन्य आठ जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. तक्रारदार संजय वसंत राठोड (३२, रा. परदरी तांडा, ता. औरंगबााद, ह.मु. देवळाई परिसर) हे आणि आरोपी परस्परांच्या ओळखीचे आहेत. आरोपींनी राठोड यांच्या सासऱ्यांसोबत जमीन खरेदीचा व्यवहार केला होता. या व्यवहारातून आरोपी आणि संजय राठोड यांच्यात वाद झाला होता. दरम्यान, ३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता राठोड आणि आरोपी सदावर्ते बंधू यांची भेट बायपासवरील रेणुकामाता कमानीजवळ झाली. यानंतर आरोपींनी राठोड यांना कमानीसमोरील मोकळ्या मैदानावर नेले. तेथे अन्य आठ आरोपी आधीच बसलेले होते. तेथे आरोपी सुधीर याने राठोड यांना बळजबरीने दारू पाजली. यानंतर आरोपी साहिलने विषारी द्रव्य पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर राठोड यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याविषयी सातारा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदविला नव्हता. शेवटी राठोड यांनी न्यायालयात तक्रार नोंदविली. दरम्यान, राठोड यांच्या तक्रारीनुसार जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पोलीस उपनिरीक्षक गोरे तपास करीत आहेत.