छ. संभाजीनगर - शासन आपल्या दारी असो किंवा इतर पायाभूत सुविधांची कामे असोत, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमात दिसून येतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चांगलीच मैत्री जमल्याचंही पाहायला मिळालं आहे. एका कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी अजित पवारांचं कौतुक करताना, तुम्हाला माझं आणि अजित पवारांचं काम माहितीच आहे, असे म्हटलं. त्यामुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत सध्या भाजपचं अधिकच सौहार्द दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशमधून राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचं मोदींनी म्हटलं होतं. तर देवेंद्र फडणवीसांनीही यापूर्वी बैलगाडी भरुन पुरावे देणार असल्याचे सांगत, आमचं सरकार आल्यावर अजित पवार चक्की पिसिंग पिसिंग... असे म्हटले होते. मात्र, सध्या भाजपासोबत अजित पवार सत्तेत असून राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यावरुन, शिवसेनेनं फडणवीसांवर जोरदार शब्दात टीका केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फडणवीसांना जुन्या विधानाची आठवण करुन दिलीय. ''राज्याचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला गद्दारी करणाऱ्या एका व्यक्तीच्या हाताखाली काम करावं लागतंय, असे म्हणत फडणवीसांना लक्ष्य केलं. तसेच, ज्या व्यक्तीवर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला. बैलगाडीभर पुरावे घेऊन जायचं होतं. ते अजित पवार चक्की पिसिंग पिसिंग म्हणायचे आणि आता अजित पवारांचं किसिंग किसिंग चालू आहे'', असे म्हणत दानवे यांनी अजित पवार आणि फडणवीसांच्या एकत्रित येण्यावर टोकदार निशाणा साधला आहे.
दरम्यान, शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही दोन गट पडले असून शरद पवार आणि अजित पवार अशी विभागणी झाली आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून भाजपला विरोध कायम असणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यात जाऊन त्यांनी सभाही घेतली होती. विशेष म्हणजे या सभेतील पवारांच्या मी पुन्हा येईन या टीकेला फडणवीसांनी चक्क अजित पवारांसमोरच प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांवर पलटवार करताना अजित पवारांना उद्देशून फडणवीसांनी भाषण केलं होतं.