- विजय सरवदे
औरंगाबाद : कोरोनाने संपूर्ण जगाचा चेहरामोहराच बदलला आहे. कोरोनाचा विषाणू संपुष्टात येईल की नाही, हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. मात्र, त्यापासून प्रत्येकाला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठात सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रापासून ‘व्हायरॉलॉजी’ हा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. ‘व्हायरॉलॉजी’ क्षेत्रात कारकीर्दीसाठी भरपूर संधी असून, या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षित तज्ज्ञ मनुष्यबळनिर्मिती केली जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘डीएनए बार कोडिंग सेंटर’मध्ये गेल्या वर्षी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या पुढाकाराने ‘सीएसआर फंडा’तून कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळा सुरू झाली. या प्रयोगशाळेच्या उद्घाटन समारंभावेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी संकल्प जाहीर केला होता की, आम्ही एवढ्यावरच थांबणार नाहीत, तर विषाणूचा सखोल अभ्यासक्रम सुरू करून प्रशिक्षित तज्ज्ञ मनुष्यबळनिर्मितीसाठी प्रयत्न केला जाईल. त्यानुसार त्यांनी विद्यापीठात ‘व्हायरॉलॉजी’ अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांना पाठविला होता. त्यांच्याकडून ‘ग्रीन’ सिग्नल मिळाल्यानंतर तो प्रस्ताव विद्या परिषदेसमोर ठेवला. विद्या परिषदेनेही त्यास मंजुरी दिली.
चालू शैक्षणिक वर्षातच हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. पहिली बॅच १५ विद्यार्थ्यांची असेल. विद्यापीठ परिसरात ‘डीएनए बार कोडिंग व कोरोना विषाणू चाचणी’ प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र इमारत उभारील जात आहे. त्यात अद्ययावत ‘व्हायरॉलॉजी लॅब’ उभारली जाणार असून, हा अभ्यासक्रम तिथेेच शिकविला जाणार आहे. हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी, तसेच प्रात्यक्षिक, विश्लेषण, संशोधनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठातील संबंधित तज्ज्ञ प्राध्यापक, तसेच काही बाहेरच्या तज्ज्ञांना पाचरण करण्यात येणार आहे.
देशातील हे पहिलेच विद्यापीठयासंदर्भात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले की, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आपण विद्यापीठाचा मुख्य परिसर व उस्मानाबाद उपपरिसरात दोन कोविड टेस्टिंग लॅब सुरू केल्या. देशातील हे पहिले विद्यापीठ आहे की, ज्याने सामाजिक बांधीलकी जपत दोन कोविड टेस्टिंग लॅब सुरू केल्या. एवढ्यावरच न थांबता कोरोनासारखे नवनवीन विषाणू येत आहेत. त्यांचा शास्त्रीय अभ्यास झाला पाहिजे. या उद्देशाने विद्यापीठात ‘व्हायरॉलॉजी’ हा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका सुरू केला जात आहे. उस्मानाबाद कोरोना टेस्टिंग लॅबचे मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केले होते. त्यावेळी विद्यापीठात ‘व्हायरॉलॉजी’ पीजी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी निधी द्यावा, असे मी त्यांंना बोललो होतो. शासनाची वाट न बघता आपण सध्या पदविका अभ्यासक्रम सुरू करत आहोत.