वाळूज महानगर : भरधाव ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण ठार, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. वाळूज एमआयडीसीतील एफडीसी कंपनीसमोर गुरुवार (दि.२५) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. शुभम माधवसिंग गोमलाडू (२१ रा.पिंपरी, ता.खुलताबाद,ह.मु. रामनगर, बजाजनगर) हा ठार झाला असून, किरण बाबासाहेब सोळस (१९, रा.घोडेगाव, ता.गंगापूर, ह.मु.बजाजनगर) हा गंभीर जखमी झाला.
शुभम व त्याचा मित्र किरण हे दोघे गुरुवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास दुचाकीने ( एम.एच.२०, बी.एच.६१४२) जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीकडून बजाजनगरच्या दिशेने जात होते. एफडीसी कंपनीजवळ पाठीमागून भरधाव ओव्हर टेक करणाऱ्या ट्रकचा (एम.एच.२०, बी.टी.४३७७) दुचाकीला धक्का लागला. या धक्याने दुचाकीस्वार शुभम ट्रकच्या चाकाखाली आला तर पाठीमागे बसलेला किरण रस्त्यावर दूर फेकला गेला. रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारक व कामगारांनी जखमींना मदत करून एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या मदतीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शुभमला मृत घोषित केले. किरणचा डावा पाय फॅक्चर झाला व अन्यत्र मुका मार लागला. पोना. किशोर घुसळे हे पुढील तपास करीत आहेत.
कंपनीत रुजू होण्याच्या पहिल्याच दिवशी काळाचा घालाशुभम आठ-दहा दिवसांपूर्वीच पिंपरी येथून वाळूज एमआयडीसीत रोजगाराच्या शोधात आला होता. जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीत शुभम व किरण यांना कंत्राटी रोजगार मिळून बुधवारी त्यांना कंपनीत प्रशिक्षण देण्यात आले होते. ते दोघे गुरुवारी सकाळी कंपनीत गेल्यानंतर काही कागदपत्रे घरी विसरल्याचे लक्षात आल्याने पुन्हा कागदपत्रे आणण्यासाठी बजाजनगरात घरी जात असताना हा अपघात झाला.