लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्मार्ट सिटी होऊ पाहणाऱ्या औरंगाबाद शहरात पहिले ई-टॉयलेट किराणा चावडी भागात सुरू करण्यात आले आहे. लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद आयकॉन्स या संस्थेच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या या सार्वजनिक स्वयंचलित शौचालयाचे गुरुवारी (दि. १३) संस्थेचे पूर्व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष राजीव मनवाणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष भावेश सराफ, प्रदीप जैस्वाल, संदीप मालू, राजेंद्र राजपाल, लक्ष्मण बाखरिया, यशश्री बाखरिया आदी उपस्थित होते.सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेची मोठी समस्या आहे. महिलांना तर अनेक अडचणींना सामारे जावे लागते. चेन्नईमध्ये ई-टॉयलेटस् पहिल्यावर औरंगाबादेत हा प्रयोग करण्याची कल्पना सुचली. त्यातून महिलांच्या सुविधेसाठी हे ई-टॉयलेट सुरू करण्यात आले, असे भावेश सराफ यांनी सांगितले.एका व्यक्तीसाठी असणाऱ्या या शौचालयाचा वापर करण्यासाठी एक, दोन किंवा पाच यापैकी कोणतेही नाणे टाकावे लागते. दरवाजा उघडताच आतील दिवे आणि एक्झॉस्ट फॅन सुरू होऊन आपोआप पाणी फ्लश होते. बाहेर पडल्यावरही सेन्सर्स तंत्रज्ञानाद्वारे पुन्हा आपोआप संपूर्ण शौचालय स्वच्छ होते. आतमध्ये हात धुण्यासाठी बेसिनदेखील आहे. पारंपरिक सार्वजनिक शौचालयांच्या दुरवस्थेस पाणी, वीज व देखभालीसाठी मनुष्यबळाची कमतरता आणि अल्पकालीन टिकाऊपणा कारणीभूत आहे. त्यावर उपाय म्हणजे ई-टॉयलेट. सुमारे साडेसहा लाख रुपयांच्या खर्चातून हे शौचालय उभारण्यात आले आहे.
महिलांसाठी शहरात पहिले ई-टॉयलेट सुरू
By admin | Published: July 14, 2017 12:40 AM