औरंगाबाद : मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र असलेली हज यात्रा रविवारपासून सुरू होत आहे. यावर्षी मराठवाड्यातून २४०५ यात्रेकरू जाणार आहेत. यात्रेकरूंचा पहिला जथा उद्या रविवारी सायंकाळी ६ वाजता चिकलठाणा विमानतळावरून थेट जेद्दाहला पोहोचणार आहे. शनिवारी सायंकाळी जामा मशीद येथील हज कॅम्पमध्ये सर्व यात्रेकरू दाखल झाले.रविवारी सकाळी ११ वाजेपूर्वी चिकलठाणा विमानतळावर सर्व यात्रेकरू दाखल होणार आहेत. दिवसभरात चार दैनंदिन विमानांची ये-जा असल्याने यात्रेकरू काही तास अगोदर विमानतळावर दाखल होतील. हज यात्रेसंदर्भात खिदमत-ए-हुज्जाज कमिटीचे करीम पटेल यांनी सांगितले की, ७ ते १६ सप्टेंबरदरम्यान दररोज एका विमानाने यात्रेकरू चिकलठाणा विमानतळावरून रवाना होतील. आमखास मैदानाजवळील ऐतिहासिक जामा मशीद येथे हज कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी ओळखपत्र, लसीकरण, आरोग्य प्रमाणपत्रांसह आवश्यक कागदपत्रांची तपासणी आणि छाननी करण्यात येत आहे. यात्रेकरू ‘अहेराम’ घालून उद्या विमानतळाकडे रवाना होतील. कमिटीतर्फे रेल्वेस्टेशन, बसस्थानक येथे स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत. मागील दोन दिवसांत शहरात दाखल झालेल्या यात्रेकरूंना अत्यंत सन्मानाने हज कॅम्पमध्ये आणण्यात आले. यात्रेच्या पहिल्या चार दिवसांत सायंकाळी ६ वाजता यात्रेकरू रवाना होतील. ११, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी रात्री २ वाजता फ्लाईट जेद्दाहसाठी रवाना होणार आहे. १४, १५ आणि १६ सप्टेंबर रोजीही सायंकाळी ६ वाजता विमान उपलब्ध राहील.विमानसेवेचे ११ वे वर्षेपूर्वी हज यात्रेकरूंना मुंबईला जावे लागत होते. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी २००५ मध्ये हज यात्रेकरूंसाठी चिकलठाणा विमानतळावरून सुविधा उपलब्ध करून दिली. सुरुवातीची दोन वर्षे नागपूर, मुंबईमार्गे विमान रवाना होत होते. २००८ पासून थेट विमानसेवा सुरू करण्यात आली. उद्या रविवारी हज यात्रेकरूंचा पहिला जथा रवाना झाल्यावर विमानसेवेचे हे ११ वे वर्षे ठरणार आहे. सकाळी ११ वाजता सर्व यात्रेकरू चिकलठाणा विमानतळावर दाखल होतील. तेथे सामानाचे एक्स-रे, पासपोर्ट, व्हिजा, कस्टमची तपासणी आदी कामे करण्यात येतील. त्यानंतर पाच वाजता ‘अस्त्र’ची नमाज पढण्यात येईल. नंतर सायंकाळी ६ वाजता विमान थेट जेद्दाहला रवाना होईल.
हज यात्रेकरूंचा पहिला जथा आज रवाना होणार
By admin | Published: September 07, 2014 12:39 AM