पैठण : पैठण येथील खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाºया कैद्यांनी केलेल्या शेतीतून कारागृह प्रशासनास यंदा ८४.५० लाख रूपयाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. राज्यातील कारागृहाच्या शेती उत्पन्नात पैठणच्या कारागृहाने प्रथम क्रमांक पटकावला आहे, असे कारागृह अधीक्षक सचिन साळवे यांनी सांगितले.खुल्या कारागृहाची कल्पना ही अत्यंत अभिनव असून स्वातंत्र्योत्तर काळात असे कारागृह असावे, या संदर्भात बराच विचार झाला व जवळवजळ वीस वर्षांच्या प्रयत्नानंतर खुल्या कारागृहाची कल्पना प्रयोग म्हणून अंमलात आली. या कारागृहातील कैद्यांचे सिंचन प्रकल्पांच्या कामात मनुष्यबळ वापरण्याची कल्पना पुढे आली. यातून पैठण येथील जायकवाडी धरणाच्या कामासाठी कैद्यांचा वापर करता येईल, या उद्देशाने पैठण येथे खुले जिल्हा कारागृह उभारण्यात आले.जायकवाडी प्रकल्पाच्या बांधकामावर १९६७-६८ पासून काम देण्यात आले. धरणाचे काम पूर्ण होईपर्यंत कैद्यांनी धरणाचे काम केले. त्यानंतर धरणासाठी संपादित केलेले परंतु वापरण्यात न आलेले मोठे क्षेत्र परिसरात होते. ही जमीन कारागृहास वर्ग करून कैद्यांकडून शेती उत्पन्न घेतले जाऊ लागले. अनेक कैद्यांनी या शेतीत आपले कसब ओतून कारागृहाची शेती विकसित केली आहे.बरेचसे कैदी ग्रामीण भागातून आलेले असल्याने अद्ययावत पद्धतीने शेती करण्याचे प्रशिक्षण त्यांना मिळाले, तर त्यांचे पुनर्वसन करणे सुलभ होईल, खुल्या कारागृहातील कैदी, तुरुंगाच्या भिंतींचे बंधन नसल्यामुळे वसतिगृहात राहिल्याप्रमाणे राहतात. त्यांना कामाचा मोबदला दिला जातो व त्यातून ते आपल्या कुटुंबियांना पैसे पाठवू शकतात. त्यांना पळून जावेसे वाटत नाही; कारण आपले हित कशात आहे, याची सुजान जाणीव त्यांना झालेली असते, असे कारागृह अधीक्षक सचिन साळवे यांनी सांगितले.कैद्यांमुळे सरकारला कोट्यवधीचा महसूलधरण उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर दक्षिण जायकवाडी या भागातील ३५० एकर संपादित जमीन कारागृहास वर्ग करून शेती व्यवसायाला सुरुवात झाली. कैद्यांना मजुरी देऊन शेती कामाला सुरुवात केली. आज या शेतीने कोट्यवधी रुपयांचा महसूल राज्य सरकारला दिला आहे. या शेतीतून यंदा गहू, बाजरी, ऊस, अन्नधान्य, चना, कडधान्य, सोयाबीन, आंबा, कोथंबीर, कढीपत्ता, करडई, मेथी, शेपू, आदी पालेभाज्यांसह पत्ता कोबी, दुधी भोपळा, मुळा, भेंडी, कांदा, गाजर, गवार, डांगर, बटाटे, शेवगा, वांगे, हिरवी मिरची, टमाटे, चवळीशेंग, चिंच आदी फळ भाजींचे उत्पादन घेतले आहे. तसेच ऊस, चारा, वैरण, शेणखत व दूध यातूनही उत्पन्न काढले आहे.संपूर्ण राज्यात ३ कोटी ८६ लाखांचे उत्पन्नराज्यातील कारागृहाच्या शेतीतून २०१७ -२०१८ या वर्षात ३ कोटी ८६ लक्ष रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात पैठण ८४ लाख ५० हजार, विसापूर ६१.३७ लाख, नाशिक ४०.३३ लाख, उस्मानाबाद ४.३४ लाख, बुलढाणा ३.५९ लाख, परभणी २.८० लाख, येरवडा ३६.२४ लाख, कोल्हापूर८.५३ लाख असे उत्पन्न मिळाले आहे.
पैठणचे खुले कारागृह राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:53 AM