औरंगाबाद : जन्मदाते वडील आणि सावत्र आईची हत्या करण्यासाठी देवेंद्र कलंत्रीने वापरलेली सुमारे तीन फुटांची लोखंडी पहार मंगळवारी सकाळी पोलिसांनी जप्त केली. यासोबतच आईचा खून केल्यानंतर प्रेत दिवाणामध्ये टाकताना फरशीवर पडलेल्या रक्ताचे डाग पुसण्यासाठी वापरलेले कपडेही पंचासमक्ष जप्त केले.
न्यायालयाने आरोपी देवेंद्रला २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गारखेडा परिसरातील गजानननगर येथील व्यापारी श्यामसुंदर हिरालाल कलंत्री (६१) आणि अश्विनी श्यामसुंदर कलंत्री (४५) यांची निर्घृण हत्या त्यांचा मुलगा देवेंद्र श्यामसुंदर कलंत्री (२७) याने केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. अवघ्या काही तासांत गुन्हे शाखेने देवेंद्रला शिर्डीत लॉजमध्ये पकडले. सोमवारी रात्री त्याची बहीण वैष्णवीच्या तक्रारीवरून देवेंद्रविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविला. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. कॉलनीतील एका टेलर महिलेसोबत त्याची मैत्री होती. तिला टेलरिंगचे साहित्य विकल्यानंतर तिच्याकडून ७०० रुपये का घेतले नाहीत, म्हणून आई-वडिलांनी शुक्रवारी रात्री त्याच्यासोबत भांडण केले. सावत्र आई सांगेल तसेच वडील वागतात, म्हणून त्या दोघांचा काटा काढल्याची कबुली त्याने दिली.
मंगळवारी पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या पथकाने त्याला घटनास्थळी नेले. वडील बहिणीला कॉलेजला सोडण्यासाठी गेले तेव्हा घरी आईच्या डोक्यात पहार घालून तिचा खात्मा केल्याचे सांगितले. घरात रक्त सांडल्याने वडील येण्यापूर्वी कपड्याने रक्त पुसले. तसेच आईचे प्रेत दिवाणात ठेवले. वडील आले, तेव्हा जिन्यातच त्यांच्या डोक्यात पहारीचा जोरदार प्रहार करून त्यांनाही संपविल्याची कबुली त्याने दिली. जन्मदात्यांची हत्या करण्यासाठी वापरलेली पहार आणि रक्ताने माखलेले कपडे पोलिसांनी पंचासमक्ष मंगळवारी जप्त केले. अत्यंत शांत डोक्याने आई-वडिलांची हत्या केल्यानंतर दोन दिवस तो त्याच्या बहिणीशी खोटे बोलत होता. अटक केल्यानंतर आता पश्चात्ताप होत असल्याचे तो सांगत आहे. त्याचा हा पश्चात्ताप म्हणजे नाटक असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
२८ मेपर्यंत पोलीस कोठडीदेवेंद्रला मंगळवारी दुपारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. आरोपीचे या हत्येत कुणी साथीदार आहेत का, त्याला पळून जाण्यासाठी कोणी कोणी मदत केली, या हत्येचे आणखी काही कारण आहे का, यासाठी त्याच्या पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी न्यायालयास सांगितले. न्यायालयाने त्यास २८ मेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.