लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील पहिल्या अवयवदानानंतर तब्बल २२ महिन्यांनी यकृत प्रत्यारोपणाची लढाई जिंकत शनिवारी वैद्यकीय क्षेत्रात औरंगाबादने आणखी एक नवा अध्याय लिहिला. ब्रेनडेड रुग्णाच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला अन् मराठवाड्यातील पहिले यकृत प्रत्यारोपण औरंगाबादेत पार पडले. या अवयवदानाने तिघांना नवीन आयुष्य मिळाले.शहरातील एन-२, ठाकरे नगरातील रहिवासी दिनेश आसावा (५५) यांना गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता ब्रेन हॅमरेज झाले. त्यामुळे ते अचानक चक्कर येऊन पडले. त्यांच्या कुटुंबियांनी तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. ब्रेन हॅमरेजचे निदान होताच शहरातील मोठ्या रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी शुक्रवारी सकाळी ११ वाजता ते ब्रेनडेड असल्याचे डॉक्टरांनी निदान केले.यावेळी कुटुंबियांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे त्यांना कमलनयन बजाज रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी ब्रेनडेड समितीने त्यांची संपूर्ण तपासणी केली. त्यानंतर ६ तासांनी दुसरी तपासणी झाली. दिनेश आसावा यांना ब्रेनडेड घोषित करून विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीचे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी यांना माहिती देण्यात आली.एमजीएम रुग्णालयात यकृत, एक किडनी माणिक हॉस्पिटल, तर एक किडनी बजाज रुग्णालयातील रुग्णास देण्याचे नियोजन करण्यात आले. मराठवाड्यात पहिल्यांदाच यकृत प्रत्यारोपण होणार असल्याने मुंबईहून ग्लोबल हॉस्पिटलचे पथक औरंगाबादेत दाखल झाले. शनिवारी पहाटेपासून अवयवदानाची प्रक्रिया सुरू झाली. रुग्णालयापर्यंत अवयव पोहोचविण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. बजाज रुग्णालयातून यकृत घेऊन निघालेली रुग्णवाहिका सकाळी ११.३० वाजता एमजीएम रुग्णालयात दाखल झाली.त्यानंतर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू झाली. तब्बल ८ तास ही शस्त्रक्रिया चालली. किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया उर्वरित दोन्ही रुग्णालयांत करण्यात आली.गरजवंतांविषयी जाणीवदिनेश आसावा यांना सोमेश्वर, शैलेश आणि पवन अशी तीन मुले आणि अनुराधा, प्रज्ञा, स्नेहल अशा तीन सुना आहेत. सर्वजण सीए आहेत. ब्रेनडेड रुग्णाचे अवयवदान शक्य आहे, दररोज मृत होणारी व्यक्ती, अवयवांची गरज असलेल्या व्यक्तींविषयी माहिती कुटुंबियांना होती. गरजवंतांच्या जाणिवेने दिनेश आसावा यांच्या पत्नी सावित्रीबाई आसावा यांच्यासह सर्वांनी तात्काळ अवयवदानाचा निर्णय घेतला.रुग्णालयाने घेतले बिलएकदा रुग्ण ब्रेनडेड घोषित झाला की, त्या क्षणापासून पुढे रुग्णाच्या कुटुंबियांना कोणताही खर्च आकारला जात नाही. यासंदर्भात विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीचा नियमही आहे; परंतु आसावा कुटुंबियांकडून रुग्णालयाने खर्च घेतला. यासंदर्भात नातेवाईकांनी (पान ७ वर)१४ वे अवयवदानआज १४ वे अवयवदान झाले. यामध्ये मराठवाड्यातील पहिले यकृत प्रत्यारोपण झाले, ही मोठी बाब आहे. जर रुग्णालयाने कुटुंबियांकडून खर्च घेतला असेल तर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आम्ही रुग्णालयास पैसे देऊ. त्यावेळी त्यांनी ते नातेवाईकांना द्यावेत.- डॉ. सुधीर कुलकर्णी, अध्यक्ष, विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती (झेडटीसीसी)
मराठवाड्यात पहिले यकृत प्रत्यारोपण यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:18 AM