औरंगाबाद : देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. राज्यातही १६ तारखेपासून लसीकरण सुरू होईल. त्यासाठी राज्य सज्ज आहे. लस प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यांमध्ये समप्रमाणात वाटप केले जाईल. पहिल्या टप्प्यासाठी ८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी को-विन ॲपवर नोंदणी झाली आहे. दोन डोसनुसार लसीचे १६ लाख डोस लागतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी औरंगाबादेत दिली.
राजेश टोपे म्हणाले, लसीकरणासंदर्भात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ‘व्हीसी’ होणार आहे. काही वेगळ्या सूचना मिळतात का, हे पाहावे लागेल. लसीकरणाचा हा कार्यक्रम हा केंद्राचा कार्यक्रम आहे. पहिल्या टप्प्यातील लसींचा खर्च, ऑपरेशनल खर्च देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. लस प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यांत समप्रमाणात वाटप केले जाईल. शासकीय आणि खाजगी रुग्णालयांतील ८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी दोन डोसनुसार १६ लाख लस लागणार आहेत. जिल्हा रुग्णालयांत लसीकरण केले जाईल. अधिक गर्दी होणार असेल, तर उपजिल्हा रुग्णालयांतही लसीकरण केले जाईल. लसीकरण सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील लसीकरण ३ महिन्यांत पूर्ण होऊ शकेल, असे राजेश टोपे म्हणाले.
सगळा डोस एकत्र मिळावा
लसींचा सर्व डोस एकत्र मिळण्याची अपेक्षा आहे. त्याबरोबर लसीकरण कार्यक्रमात काही तुटफूट होऊन डोस खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे २ ते ३ टक्के अधिक लस मिळण्याचीही गरज आहे, असेही राजेश टोपे म्हणाले.