मान्सूनपूर्व नालेसफाई न केल्याने मंगळवारी पडलेल्या पहिल्याच पावसात शहरातील अनेक वसाहतीतील घरादारात पाणी घुसल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. दरम्यान, बुधवारी खडबडून जागे झालेल्या नगरपरिषद प्रशासनाने वसाहतीतील पाणी बाहेर काढण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. परंतु, सायंकाळपर्यंत यंत्रणेला वसाहतीतून पाणी बाहेर काढण्यात यश आले नाही. दिरंगाईमुळे घरात पाणी शिरलेल्या नागरिकांनी न.प.च्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला.
मंगळवारी रात्री पैठण शहरात दोन तासात ५४ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसामुळे शशिविहार, पन्नालालनगर, सराफनगर, बालाजीनगर, कावसान या वसाहतीतील घरादारात नाल्याचे पाणी घुसले. इंदिरानगरमधून वाहणारा नाला शशिविहारच्या पुढे ब्लॉक झाला आहे. नागरिकांनी न.प. प्रशासनास वेळोवेळी नालेसफाई करण्याबाबत कळविले होते. मान्सूनपूर्व नालेसफाई करणे गरजेचे असताना, न.प. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्याने पावसाचे पाणी वसाहतीत घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
दरम्यान, नगरपरिषद स्वच्छतेसाठी एका संस्थेला दरमहा लाखो रुपये मोजत असूनदेखील वेळेत साफसफाई होत नसल्याचे चित्र आहे.
- शशिविहार जलमय
शशिविहार या हायप्रोफाईल वसाहतीसह परिसरातील सराफनगर भागातील नागरिकांना पाणी साचल्याने सकाळी घरातून बाहेर पडणे सुध्दा शक्य झाले नाही. शशिविहारच्या प्रांगणात साचलेल्या पाण्यात विषारी साप आल्याने महिलांसह मुलांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. साचलेल्या पाण्यात अनेक विषारी साप फिरत होते, दरम्यान, एक मोठा साप माझ्या घराच्या पायरीवर दिसून आला. या प्रकाराने घरातील सदस्य घाबरले. शेवटी सर्पमित्रास बोलावून घरासमोरील साप पकडावे लागले, असे शशिविहार भागातील रहिवासी संतोष राऊत, भाऊसाहेब पिसे, महादेव गायकवाड आदींनी सांगितले.
- मुख्याधिकारी पाहणीसाठी आले नाहीत
मान्सूनपूर्व नालेसफाईचे काम नगरपरिषदने केले नाही. शशिविहारच्या पुढे अनेकांनी नाल्यावर अतिक्रमण केले असून ते काढण्याची हिंमत प्रशासनात नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. मुख्याधिकारी शहरात होते, त्यांना वारंवार बोलावून देखील ते परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले नसल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पिसे यांनी केला.
----- फोटो
020621\img-20210602-wa0018.jpg~020621\img_20210602_183224.jpg
पहिल्याच पावसात पैठण शहरातील हायप्रोफाईल शशिविहार वसाहत अशी जलमम झाली होती...~पहिल्याच पावसात पैठण शहरातील हायप्रोफाईल शशिविहार वसाहत अशी जलमम झाली होती...