- संतोष हिरेमठछत्रपती संभाजीनगर : पूजा करताना, मंदिरात प्रवेश करताना घंटी वाजविली जाते, हे सर्वांना माहीतच आहे. परंतु रेल्वे स्टेशनवरदेखील अगदी मंदिराप्रमाणे घंटी आहे आणि ती रोज वाजविली जाते, हे अनेकांना माहीत नसेल. कर्तव्यावर जाण्यापूर्वी म्हणजेच रेल्वे चालविण्यापूर्वी प्रत्येक लोकोपायलट आणि असिस्टंट लोकोपायलट घंटी वाजवूनच रेल्वे स्टेशनवरून रवाना होतात, हे विशेष.
घंटी वाजवूनच मंदिरातच प्रवेश केला जातो. धार्मिक विधीत आणि पूजेमध्येही घंटीचे विशेष महत्त्व आहे. आरती करताना किंवा आरतीनंतर घंटी वाजविली जाती. रेल्वे स्टेशनवरही या घंटीचे आगळेवेगळे स्थान असल्याचे पाहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर असलेली ही घंटी वाजवूनच लोकोपायलट, असिस्टंट लोकोपायलट कर्तव्यावर रवाना होतात.त्यांच्या कार्यालयात ही घंटी आहे. कर्तव्यावर जाण्यापूर्वी विविध प्रकारची नोंद करण्याबरोबर प्रत्येक रेल्वेचालक ही घंटी वाजवितो आणि त्यानंतरच इंजिनच्या कक्षाकडे रवाना होतो.
का वाजवतात?घंटी वाजविल्यामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी, नादाने प्रसन्नता निर्माण होते. मन एकाग्र होण्यास मदत होते. नकारात्मकता दूर होते. घंटी वाजवून रवाना होताना एकप्रकारे सतर्कता निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक लोकोपायलट, असिस्टंट लोकोपायलट घंटी वाजवूनच रवाना होतो, असे सांगण्यात आले. प्रत्येक रेल्वे स्टेशनवर घंटीज्या रेल्वे स्टेशनवर रेल्वेचालकांची बदली होते, जेथून रेल्वे चालकांना कर्तव्य दिले जाते, अशा प्रत्येक रेल्वे स्टेशनवर अशी घंटी असते, असेही सांगण्यात आले.