फुलंब्री : तालुक्यात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाला निधोना गावातील मराठा आंदोलकांनी आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास रोखले. आधी मराठा आरक्षण, नंतर शासकीय कार्यक्रम, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी यात्रा रथास परत पाठवले.
देशभरात केंद्र शासनाच्यावतीने विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. १ डिसेंबर पासून यात्रेचा रथ फुलंब्री तालुक्यातील गावांमध्ये फिरत आहे. याद्वारे केंद्र शासनाच्या २९ विविध योजनांची माहिती गावागावात देऊन शासकीय अधिकारी, कर्मचारी जनजागृती करतात.
दरम्यान, आज सकाळी ११ वाजता अधिकारी, कर्मचारी रथासह निधोना गावात पोहचले होते. त्यावेळी मराठा समाज बांधवांनी गावच्या प्रवेश द्वारावरच रथा रोखले. आधी मराठा आरक्षण, नंतर शासकीय कार्यक्रम अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी गावात प्रवेश करू नका असा इशारा दिला.
जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात राजकीय नेत्यांना, राजकीय आणि शासकीय जाहिरात बाजी करणाऱ्या कार्यक्रमावर बंदी असल्याचे सांगितले. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर संकल्प यात्रेचा रथ मागे फिरला. यावेळी एक मराठा,लाख मराठा, मराठा आरक्षण आमच्या काचे नाही कुणाच्या बापाचे अशा विविध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. निधोना ग्रामस्थांनी रथ परत पाठविल्यामुळे या यात्रेला इतर गावात ही विरोध होण्याची शक्यता आहे.