छत्रपती संभाजीनगर : पैठणच्या ४० वर्षीय महिलेने अडीच महिन्यांचे बाळ शहरातील एका अनाथालयाला विकले. अनाथालय चालक दाम्पत्याने चिमुकल्याला पाच लाख रुपयांमध्ये विकायला काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शिवशंकर कॉलनीतील जिजामाता बालक आश्रमात मंगळवारी हा प्रकार समोर आला. बाळाला विकणारी आई, बाळाचा मामा अमोल मच्छिंद्र वाहुळ, अनाथालय चालक दिलीप श्रीहरी राऊत व त्याची पत्नी सविता यांच्यावर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
भरोसा सेलच्या निरीक्षक आम्रपाली तायडे यांना मंगळवारी सकाळी या अनाथालयामध्ये एका बालकाची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तत्काळ उपनिरीक्षक अनिता फसाटे, ज्योती गात यांच्यासह सापळ्याचे नियोजन केले. जवाहरनगरचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांना याबाबत कळवून सहायक निरीक्षक दिलीप चंदन यांचे पथक मदतीला घेतले. ११.४५ वाजता त्या पथकांसह अनाथालयाच्या दिशेने रवाना झाल्या. १२ वाजता तेथे पोहोचताच त्यांनी समोर आलेल्या दिलीपला बाजूला केले. फसाटे व गात यांनी संपूर्ण आश्रमाची पाहणी सुरू केली. एका खोलीत झोळीत बाळ झोपलेले होते, तर दिलीपची पत्नी सविता तेथेच बसलेली होती. त्यांनी त्याची चौकशी सुरू केली. दिलीपने पैठण तालुक्यातील दाभूळ येथील सुनीता विलास साबळे हिने भावासह बाळ दत्तक देण्यासाठी १४ जून रोजी आम्हाला दिल्याचा दावा केला. परंतु ते सुनीताचेच मूल आहे, असा कुठलाही पुरावा त्यांच्याकडे नव्हता. त्याच वेळी तेथे बाल दत्तक घेण्यासाठी प्रदीप नंदकिशोर डागा (४०, रा. संमेक आर्केड, कॅनॉट प्लेस) पत्नीसह आलेले होते. त्यांच्या चौकशीत राऊत त्यांना पाच लाख रुपयांमध्ये बाळ देणार होता, असा जबाब दिला.
ना परवाना, ना अधिकारअनाथालय चालक दाम्पत्यावर यापूर्वी जवाहरनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. शिवाय त्यांच्याकडे बाळ दत्तक देण्याचा कुठलाही परवाना नाही. तेथे चिमुकल्याची आई असल्याचा दावा करणाऱ्या सुनीताचा अर्ज सापडला. त्यात माझ्या पतीचे निधन झाले असून, हे चौथे अपत्य बिकट आर्थिक परिस्थितीमुळे सांभाळू शकत नसल्याचे म्हटले आहे. सोबत एक १०० रुपयांचा सही केलेला कोरा बॉण्ड व इतर कागदपत्रे जोडली. यावेळी या अनाथालयात केवळ दोन अनुक्रमे नववी व दहावीत शिकणारे दोन भाऊ आश्रयास होते. डागा यांच्याकडून दिलीपने दहा हजार रुपये ॲडव्हान्स घेतला होता.
सुनीताच आई कशी ?सुनीताने अर्जासोबत बाळाचा २१ एप्रिल २०२३ चा जन्म असल्याचा दावा केला आहे; परंतु पतीच्या जोडलेल्या मृत्यू प्रमाणपत्रावर पतीचे निधन १६ नोव्हेंबर २०२१ रोजी झाल्याचे नमूद आहे. शिवाय, तिसरे अपत्य चार वर्षांचे असल्याचे पोलिसांना कॉलवर सांगितले. तिच्या सर्वच माहितीत व कागदपत्रांमध्ये तफावत असल्याने सुनीता तरी बाळाची आई कशावरून, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
अधिकाऱ्यांनी दिवसभर सांभाळलेउपनिरीक्षक फसाटे व गात यांनी छाप्यानंतर बाळाला ताब्यात घेतले. सायंकाळपर्यंत दोघींनीच त्याला सांभाळत देखभाल केली. सायंकाळी बालसमितीच्या आदेशाने समाजमंदिराच्या ताब्यात दिले; परंतु डागा यांना दिलीप बाळ विकत असल्याचे कळले कसे, दिलीपने यापूर्वी असे प्रकार केले आहेत का, पैठणच्या महिलेला दिलीपविषयी कशी माहिती मिळाली, हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत.