गंगापूर (औरंगाबाद): एका व्यवहाराच्या वादातून शिवीगाळ केल्याचा राग आल्याने पार्टी देतो म्हणून बोलावून आधी दारू पाजली आणि त्यानंतर शीर धडावेगळे केल्याची धक्कादायक कबुली आरोपींनी दिली आहे. यामुळे मांजरी शिवारात मंगळवारी शिर नसलेला मृतदेह अधाल्याचा उलगडा झाला आहे. लक्ष्मण रायभान नाबदे ( ५५,रा.बोलेगाव,ह.मु. गंगापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी तिघांना २१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हत्येची घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती.
तालुक्यातील मांजरी शिवारात शिर नसलेला मृतदेह एका विहिरीत तरंगताना आढळुन आला होता. तपासात शिर व मृताचे कपडे आरोपींनी कायगाव शिवारात एका झुडुपात लपवून ठेवल्याचे पुढे आले होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सचिन सोमिनाथ गायकवाड (२०), शुभम विनोदकुमार नाहटा (२३, रा.गंगापूर ) यांना मंगळवारी ताब्यात घेतले होते. तर तिसरा फरार आरोपी विशाल नामदेव गायकवाड(२३, रा.रांजनगाव पोळ ) यास पुणे येथून अटक केली आज ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या तिघांनी खून केल्याची कबुली दिली आहे.
असा रचला कटतीन आरोपींपैकी शुभम याने लक्ष्मण नाबदे यांच्याकडून दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते. मात्र, शुभमने वेळेवर पैसे परत न केल्याने नाबदे त्याला सतत पैशांची मागणी करत होते. अनेकदा तर शिवीगाळ सुद्धा करायचे. याचा राग आल्याने शुभमने आपल्या दुकानातील कामगाराच्या व आणखी एका साथीदाराच्या मदतीने नाबदे यांचा खून करण्याचं ठरवलं. तिघांनी कट रचत नाबदे यांना पार्टीसाठी शनिवारी (दि. १४) रात्री मांजरी शिवारात बोलवून घेतले. एका ठिकाणी निवांत बसून त्यांना दारू पाजली. त्यानंतर त्यांचा शीर धडावेगळे केल्याची कबुली आरोपींनी दिली. अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहे.