लातूर : लातूर लोकसभा निवडणुकीत २ लाख ५३ हजार ३९५ मतांची आघाडी पहिल्यांदाच भाजप उमेदवाराच्या खात्यावर जमा झाली आहे़ या मतदारसंघात भाई उद्धवराव पाटील, बापूसाहेब काळदाते, शिवराज पाटील चाकूरकर आदी दिग्गजांनी निवडणुका लढविल्या आहेत़ मात्र असे मताधिक्य कधी कोणाच्या पारड्यात पडले नव्हते़ लातूर लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर ही दुसरी निवडणूक झाली असून, मताधिक्याचा इतिहास निर्माण झाला आहे़ लातूर लोकसभेसाठी पहिली निवडणूक १९७७ ला झाली़ शेतकरी कामगार पक्षाचे भाई उद्धवराव पाटील यांनी १ लाख ७८ हजार ८१५ मते घेऊन प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पी़जी़पाटील यांचा ८ हजार मताधिक्याने पराभव केला़ १९७७ नंतर १९८० ला पुन्हा सार्वत्रिक निवडणूक झाली़ काँग्रेसचे शिवराज पाटील, शेकापचे उद्धवराव पाटील, अपक्ष एऩएस़सोनवणे, एऩजी़ हरणे, एऩएऩबलुरे, के़जी़पाटील आदी उमेदावर रिंगणात होते़ या निवडणुकीत शिवराज पाटील चाकूरकर यांना २ लाख ५३ हजार ९४८ इतकी मते पडली़ १ लाख ५९ हजार ८६७ मताधिक्याने चाकूरकरांनी अपक्ष उमेदवार एम़एस़सोनवणे यांचा पराभव केला़ १९८० चे १ लाख ५९ हजार ८६७ मताधिक्य वगळता लातूर लोकसभेच्या निवडणुकीत कोणालाही मताधिक्य मिळाले नव्हते़ या मताधिक्याचा इतिहास निर्माण झाला़ यापुढील सर्व निवडणुका रूपाताई पाटलांचा अपवाद वगळता शिवराज पाटलांनी जिंकल्या परंतु, त्यांचेच मताधिक्याचे रेकॉर्ड त्यांनाही तोडता आले नव्हते़
पहिल्यांदाच अडीच लाखांची आघाडी !
By admin | Published: May 16, 2014 10:43 PM