बीड : या वर्षापासून बीडमध्ये प्रथमच नॅशनल इलिजिब्लिीटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षा होत असून शहरातील तीन केंद्रांवर ११४० विद्यार्थीपरीक्षा देणार आहेत. या परीक्षेच्या अनुषंगाने तयारी पूर्ण झाली असून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याांना सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेतच प्रवेश दिला जाणार आहे. साडेनऊ वाजेनंतर कोणत्याही सबबीखाली प्रवेश मिळणार नसल्याचे सूचित केले आहे.
नीट परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढती संख्या व इतरत्र ठिकाणी परीक्षा केंद्रांमुळे मागील वर्षी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आ. विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी बीड येथे परीक्षा केंद्र मंजूर करावे अशी मागणी पुढे आली होती. सहा हजार विद्यार्थ्यांची सोय व्हावी या दृष्टीने केंद्राची मागणी केली होती. त्यानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने बीड येथे परीक्षा केंद्र मंजूर केले. त्यावेळी २००० विद्यार्थ्यांसाठी बीड केंद्र असेल असे जाहीर झाले होते. परंतू नोंदणी केलेल्या केवळ ११४० विद्यार्थ्यांनाच बीड येथे परीक्षा केंद्र मिळाले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना मात्र पुणे व इतर ठिकाणी परीक्षा केंद्र मिळाले आहे.
६ मे रविवारी होणाऱ्या नीट परीक्षेसाठी बीडमध्ये चंपावती माध्यमिक विद्यालय, नगर रोड, कर्मवीर महिला अध्यापक महाविद्यालय, हनुमान मंदिर रोड शाहूनगर आणि गुरुकुल इंग्लिश स्कूल गुरुकुलनगर जालना रोड, बीड हे तीन परीक्षा केंद्र आहेत. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महावितरणला पत्राद्वारे सहकार्याची मागणी करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रनिहाय ६ पोलीस कर्मचारी नियुक्त केले जाणार असल्याचे समजते.
सुलभ तपासणीसाठी नियमावली
नीट परीक्षेसाठी संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावर सर्व सूचना नमूद केल्या आहेत. परीक्षा केंद्रावर तपासणी सुलभ व्हावी म्हणून ड्रेस कोड निश्चित केला आहे. - परीक्षार्थ्यांना बूट, सॉक्स घालून येण्यास प्रतिबंध असून सॅन्डल किंंवा स्लीपर चप्पल घालून येण्याबाबत सूचित केले आहे.विशेषत: सॅन्डलला हिल नसावे. - वेबसाईटवर अपलोड केलेल्या फोटो कॉपी तसेच प्रवेशपत्र एवढेच विद्यार्थ्यांनी आणावेत असेही सुचविले आहे.- परीक्षा पारदर्शीपणे व सुरळीत व्हावी या उद्देशाने ही नियमावली तयार केली आहे. परीक्षा व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांना याबाबत सर्व सूचना दिल्या आहेत.
तीन ठिकाणी तपासणी६ मे रोजी सकाळी १० ते ०१ वाजेदरम्यान नीट परीक्षा होणार आहे. ७.३० ते ९.३० या वेळेत परीक्षांर्थींना केंद्रावर हजर रहायचे आहे. तीन टप्प्यात तपासणीनंतर त्यांना केंद्रात प्रवेश मिळणार आहे.
तीन केंद्रांवरील परीक्षार्थी गुरुकुल इंग्लिश स्कूल ५४०चंपावती मा. विद्यालय ३६०कर्मवीर महिला कॉलेज २४०
मेटल डिटेक्टर, बॅटरीने तपासणी सर्व परीक्षार्थींची मेटल डिटेक्टरने तपासणीनंतर केंद्रात प्रवेश मिळणार आहे. परीक्षार्थी मुलींची स्वतंत्र तपासणी महिला करणार आहेत. वेळप्रसंगी परीक्षार्थीच्या कानांची बॅटरीच्या उजेडात तपासणी होईल.