छत्रपती संभाजीनगर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) टप्पा २ मध्ये जिल्ह्यातील २९६ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांतील २९६ सरपंचांना प्रथम प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतरच पोकराची अंमलबजावणी करण्याची तयारी कृषी विभागाकडून सुरू आहे.
पोकरा टप्पा १ मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने हा निर्णय घेतल्याचे कळते. ऑगस्ट महिन्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा १ समाप्त झाला. जागतिक बँकेच्या सहकार्याने केंद्र आणि राज्य सरकारने पोकरा टप्पा २ राबविण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीपूर्वी केली. यानंतर राज्यातील गावांची निवड करण्यात आली. पोकरा योजनेमुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांना विविध योजनांचा अनुदानावर लाभ देण्यात आला. लाभार्थी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. पोकरा १ च्या सकारात्मक बाबींचा विचार करून शासनाने पोकरा टप्पा २ राबविण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २९६ गावांची या योजनेसाठी निवड करण्यात आली. पोकरा टप्पा १ चा लाभ घेताना शेतकरी आणि कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा अपहार केला. पोकरा घोटाळ्याची वृत्त मालिका ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवर त्यांनी उचललेल्या शासनाच्या अनुदानाची रक्कम बोजा म्हणून टाकण्यात आली.
आता टप्पा २ ची अंमलबजावणी करताना शासनाने या योजनेत अपहार होऊ नये, याची खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. १ एप्रिलपासून या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे. तत्पूर्वी, जिल्ह्यातील २९६ सरपंचांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात सरपंचांना मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे हे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.