खुलताबाद : दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन हे ट्रक शेजारील कारवर आदळल्याने पाचही वाहनांचे अतोनात नुकसान झाले असून, यामध्ये दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. हा विचित्र अपघात झालेल्या विचित्र अपघातात वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरासमोर शनिवारी पहाटे झाला.
वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरासमोर अरुंद रस्ता आहे. तसेच या रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनीस वाहने उभी राहतात. यामुळे सतत वाहतुकीची कोंडी होत असते. शनिवारी पहाटे खुलताबादहून कन्नडकडे वेगाने जाणारा गव्हाचा ट्रक (एमपी १२ एच ०४०३)ची समोरून खुलताबादकडे येणाऱ्या भरधाव ट्रक (एमएच २० एए ७७२७) ला धडकला. यामध्ये गव्हाचा ट्रक हा पलटी होऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या भाविकांच्या तीन कारवर जोराने आदळला.
यामध्ये कारचा चक्काचूर झाला असून, यामध्ये एमएच १२ व्हीटी ७५१७ या कारमधील कारचालक राहुल शंकर गायकवाड (रा. हिंगणगाव, ता. हवेली, जि. पुणे) हे व दुसऱ्या एमएच २० सीबी १९६५ या कारमधील शैलेजा एमएन राव (झारखंड) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी तत्काळ खुलताबाद ग्रामीण रुग्णालय व तेथून छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. या विचित्र अपघातात रस्त्याच्या कडेला असलेल्या पानफुलं व रुद्राक्ष विक्री करणाऱ्या छोट्या दुकानांचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर सामाजिक कार्यकर्ते मसियोद्दीन सौदागर, सुनील लोखंडे व महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने दूर केली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
अरुंद रस्त्याच्या कडेला राहतात वाहने उभीवेरूळ लेणी ते वेरूळ मंदिरापर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमणे झाली असून, रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला पर्यटक व भाविकांची वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा या ठिकाणी सतत निर्माण होत असतो. जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने वेरूळलेणी ते वेरूळ गावापर्यंत रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमणे प्रशासनाने जमीनदोस्त केली होती. मात्र काही महिन्यांनंतर ही अतिक्रमण ‘जैसे थे’ झाल्याने पुन्हा त्रास वाढला आहे.