औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सरसकट १६ मार्चपासून घेण्याची तत्परता परीक्षा विभागाने दाखवली. मात्र, ही चूक उशिरा लक्षात आल्यानंतर आता पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांसोबत एप्रिलमध्ये घेतल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात बारावीच्या परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर झाला. त्यानंतर महाविद्यालयीनस्तरावर उशिरानेच प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. आता कुठे ऑफलाईन वर्ग सुरु झाले तोच कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे महाविद्यालयांतील वर्गही थांबले. अजून प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. तोच विद्यापीठाने सरसकट पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ मार्चपासून घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे हे विद्यार्थी पेचात पडले. तथापि, परीक्षेसंबंधी जाहीर केलेल्या तारखेची चूक लक्षात आल्यानंतर परीक्षा विभागाने द्वितीय व तृतीय वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ मार्चपासून, तर प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या परीक्षा एप्रिलमध्ये घेतल्या जातील, असे कळविले आहेे.
तथापि, यंदाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन, अशा दोन्ही सुविधा दिल्या जाणार असून विद्यार्थ्यांनी सोमवारपर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यापैकी एक पर्याय नोंदवायचा आहे. नोंदविलेल्या पर्यायानुसारच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन व ऑफलाईन यापैकी एकही पर्याय संकेतस्थळावर नोंदविणार नाहीत. अशा विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन पध्दतीने होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रात ऑफलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे.
संकेतस्थळावर कसा निवडायचा पर्यायसंकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांनी ‘क्लिक हेअर फॉर बामू युनिव्हर्सिटी पोर्टल’ उघडावे. तेथे ‘लॉगीन हेअर’ या बटनाचा पर्याय वापरून विद्यार्थ्यांनी आपला कायम नोंदणी क्रमांक (पीआरएन) आणि आपला पासवर्ड टाकून लॉगीन करावे. आपल्या लॉगीनच्या मुख्य पानावरील डाव्या बाजूस असलेल्या ‘विलींगनेस टू ॲपिअर इन इक्झाम’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांनी परीक्षा अर्ज भरलेल्या अभ्यासक्रमाची नावे दिसतील. अभ्यासक्रमाच्या नावासमोर ‘अप्लाय’ या लिंकवर ऑनलाईन किंवा ऑफलाईन हा पर्याय निवडायचा आहे.