औरंगाबाद: अभियांत्रिकीचा विद्यार्थी असलेल्या पोलीस पुत्राने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही मात्र अभ्यासाच्या ताणातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे,अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
गणेश विष्णू गायके (वय १८,रा. तोरणागडनगर, म्हाडा कॉलनी, एन-२)असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, तोरणागडनगर येथील रहिवासी गणेश हा सिडकोतील जेएनईसी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात शिकत होता. त्याला निवांत अभ्यास करता यावा, यासाठी त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यासाठी घराच्या गच्चीवर स्वतंत्र एक खोली बांधली होती.
गुरूवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तो जेवण करून नेहमीप्रमाणे अभ्यास करण्यासाठी त्याच्या खोलीत गेला. तो अभ्यास करीत असेल म्हणून रात्री साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत कोणीही त्याच्या खोलीत गेले नव्हते. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास त्याची आई त्यास जेवण करण्यासाठी बोलवण्यासाठी त्याच्या खोलीत गेली तेव्हा त्यांना गणेशने पत्र्याच्या खोलीतील अँगलला दोरी बांधून गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर घरातील अन्य मंडळी आणि शेजाऱ्यांनी तेथे धाव घेतली. त्यांनी त्यास बेशुद्धावस्थेत एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून घाटीत नेण्याचे सांगितले. घाटीतील अपघात विभागातील डॉक्टरांनी गणेशला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोहेकाँ लक्ष्मण राठोड तपास करीत आहे.