माजलगाव: येथील माजलगाव धरणातील मासे पकडण्याचा ठेका एकाच व्यक्तीला दहा वर्षापासून दिला जात आहे. हा ठेका रद्द करावा या मागणीसाठी मच्छीमारांनी मंगळवारी माजी न्या. बी.जे. कोळसे पाटील व आव्हाण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव नाईकनवरे व विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव धरणात आंदोलन केल्याने प्रशासनही हादरुन गेले. माजलगाव धरणातील मासे पकडण्याचा ठेका दहा वर्षापासून भाटवडगाव येथील माणिक शहा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेला दिला जातो. गेल्या दहा वर्षापासून एकाच संस्थेला हा ठेका दिला जात आहे. ठेक्यासाठी वर्षासाठी केवळ दिड लाख रुपये घेतले जात असल्याने शासनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. गेल्या वर्षी माजलगाव तालुक्यातील पिकांची आनेवारी जात असल्याने तालुका दुष्काळग्रस्त म्हणून दाखवला गेला नाही. परंतु मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांनी ठेकेदारांशी संगनमत करुन मागील वर्षी दुष्काळ दाखवून हा ठेका परत त्यांनाच देण्यात आला होता. संबंधीत ठेकेदाराकडून मच्छीमारांची अडवणूक करण्यात येऊन रॉयल्टी घेवुनही मच्छीमारांकडून मासे जबरदस्ती घेणे, न दिल्यास अडवणूक करणे असे प्रकार केले जात आहेत. माजलगाव येथे पाच हजार मच्छीमार असतानाही बाहेर राज्यातून मच्छीमार आणले जात आहेत. यामुळे माजलगावातील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली होती. आव्हाण संघटनेने या विरोधात अनेकवेळा आंदोलनही केले होते तरही हा ठेका रद्द करण्यात आला नाही. त्यामुळे माजी न्या. बी.जे. कोळसे पाटील व आव्हाण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव नाईकनवरे, विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी माजलगाव धरणात आंदोलन केले. मंगळवारी मच्छीमारांनी सकाळी चार वाजल्यापासून धरणातील पाण्यात जाऊन मासे पकडले तर संभाजी चौकातून पाच किमी अंतरावर असलेल्या धरणावर मोर्चा काढला. या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. भर उन्हात आंदोलन केल्याने चार-पाच महिलांना भोवळ आली. हे आंदोलन पाच तास चालले. हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसताच मत्स्य आयुक्तांनी वरिष्ठांशी बोलुन ठेक्यामुळे मच्छीमारांवर अन्याय होत असून हा ठेका रद्द करण्याची शिफारस केली. यावेळी उप-जिल्हाधिकारी महेंद्र कांबळे, पोलिस उप-अधीक्षक के.ए. डोळे, सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी दिलिप ओरंबे, सहायक आयुक्त अभय देशपांडे, तहसीलदार डॉ. अरुण जराट, पोनि अन्वर खान उपस्थित होते. ठेका रद्द न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. विशेष म्हणजे जमावबंदीचा आदेश झुगारुन पाच तास आंदोलन केले. (वार्ताहर)
माजलगाव धरणात मच्छीमारांचे आंदोलन
By admin | Published: July 01, 2014 11:16 PM