सोयगाव : तालुक्यातील वाकडी येथील जि.प. प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहारात चक्क बुरशी लागलेली डाळ शिजविण्यात आल्याने खळबळ उडाली.संबंधित मुख्याध्यापकाने बुरशीजन्य आणि मुंग्या लागलेली डाळ शिजविण्याची सक्ती करून ही डाळ न शिजविल्यास घराचा रस्ता धरा, अशी सक्तीची सूचना दिल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच गटविकास अधिकारी एम.सी. राठोड, गटविस्तार अधिकारी राजेंद्र फुसे यांनी बुधवारी वाकडी गावाला भेट देऊन बुरशीजन्य डाळीचा पंचनामा करून डाळ तपासणीसाठी जप्त केली.सदर शाळेत संगीताबाई भोसले या आहार शिजविण्याचे काम करतात. मेनू कार्डप्रमाणे आहार शिजविताना सांबार, भात करण्यासाठी लागणारी मुगाची डाळ प्रमाणात पाहिजे असताना संबंधित मुख्याध्यापकाने या महिलेला तब्बल ३५ किलो जुनी बुरशीजन्य डाळ शिजविण्यास दिली व विद्यार्थ्यांना पोषण आहारातून खाऊ घालण्यासाठी सक्ती केली. या प्रकरणी संगीताबाई यांनी सोयगाव पंचायत समितीकडे तक्रार दिल्यानंतर खळबळ उडाली.या शाळेत पहिली ते सातवी इयत्तेत शिक्षण घेणारे तब्बल ९० विद्यार्थी आहे. बुरशीजन्य डाळ शिजविण्यासाठी दिल्याचे आहार शिजविणाºया महिलेच्या लक्षात येताच त्यांनी थेट सोयगाव पंचायत समितीत डाळ आणून गटविकास अधिकारी एम.सी. राठोड यांच्या लक्षात हा प्रकार आणून दिला. गटविकास अधिकारी यांनी तातडीने या तिन्ही शिक्षकांची चौकशी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना विस्तार अधिकारी राजेंद्र फुसे यांना दिल्या.कोट१) संबंधित प्रकार थरारक होता. चक्क शिक्षकांनीच शाळेत हेतूपुरस्कर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये संबंधित मुख्याध्यापक आणि दोन शिक्षक दोषी आढळत आहेत. कारवाईचा अहवाल तातडीने जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पाठविण्यात येईल. शाळेची गुणवत्ताही खालावली आहे. त्यामुळे शाळेचे शिक्षकच चौकशीत दोषी आढळतील.-एम. सी. राठोड, गटविकास अधिकारी, सोयगाव२)संबंधित शाळेला भेट दिली आहे. यामध्ये चौकशी करून अहवाल सादर केल्या जाईल. चौकशीत आहार शिजविणाºया महिलेला पुरविण्यात आलेली मुगाची डाळ वापरात न येणारी होती. सदर डाळ नष्ट करणे आवश्यक होती, परंतु संबंधित मुख्याध्यापकाने तसे न करता तीच जुनी डाळ आहारासाठी वापरण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.-राजेंद्र फुसे, विस्तार अधिकारी (शिक्षण)३) २००४ पासून मी आहार शिजविण्याचे काम करत असताना या मुख्याध्यापकांना व दोन शिक्षकांना शाळेत विपरीत प्रकार घडवून मला कामावरून कमी करण्याचा कट आखला होता. या प्रकारातूनच यांनी मला बुरशीजन्य डाळ शिजविण्यासाठी दिली. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका होऊन माझ्यावर कारवाई होईल, असा या मुख्याध्यापकांचा कट होता.-संगीताबाई भोसले, आहार शिजविणारी महिला.
शालेय पोषण आहारात चक्क बुरशीजन्य डाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:59 PM