औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी वेगवेगळ्या चार गावांत पोळा सणानिमित्त बैल धूत असताना पाच मुलांचा जलसाठ्यांमध्ये बुडून मृत्यू झाला. मृतात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. या घटनांमुळे चारही गावांतील पोळा सणावर शोककळा पसरली आहे.
खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगीनजीक कनकशीळ येथील घटनेत राहुल आबाराव म्हस्के (१४) हा मुलगा बैल धुण्यासाठी पाझर तलावात गेला असता तलावातील विहिरीचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तो सकाळी ३-४ मित्रांसह कनकशीळ येथील गट नं.२३५ मधील विश्वास काशीनाथ कामठे यांच्या शेतातील पाझर तलावात बैल धुण्यासाठी गेला होता. राहुल बुडाल्याचे पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील म्हस्के वस्तीवरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरु केले. सकाळी आठ वाजता पाण्यात बुडालेल्या राहुलला ११ वाजता प्रकाश गायकवाड यांनी पाण्याबाहेर काढला. यानंतर राहुलच्या शरीराची हालचाल झाल्याचे जाणवल्याने जमलेल्या नागरिकांना व नातेवाईकांना आनंद झाला. नागरिकांनी त्यास लगेच पुढील उपचारासाठी एका खाजगी जीपने औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलविले, परंतु तेथे वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून राहुलला मृत घोषित केले. घाटी रुग्णालयात दुपारी उशिराने शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. राहुल हा बाजारसावंगी येथील जि.प. प्रशालेचा इयत्ता नववीचा विद्यार्थी होता.
दुसरी घटना कन्नड तालुक्यात घडली. अंबाडी धरणात बैल धूत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने अंधानेर येथील कैलास भावराव बाविस्कर (२४) हा रविवारी सकाळी बुडून मरण पावला. कन्नड शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे. कॉ.रामचंद्र बोंदरे करीत आहेत.
तिसरी घटना देवगाव रंगारीनजीक माटेगाव शिवारातील छोट्या तलावात घडली. नवनाथ गवळी (१४, रा. चांभारवाडी ) हा वडील ज्ञानेश्वर व आजोबासोबत सकाळी तलावात गुरे धुण्यासाठी गेला होता.काही जनावरे धुणे झाल्यानंतर ज्ञानेश्वर गवळी हे बाजूला बैल बांधण्यासाठी गेले असता त्याच वेळेस नवनाथच्या हातात असलेल्या बैलाने हाताला झटका दिल्याने नवनाथ पाण्यात पडला आणि बुडाला. माजी सरपंच अर्जुन साबळे, अर्जुन गवळी, रामदास गवळी आदींनी त्याला पाण्याबाहेर काढून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. आठवीत शिकणारा नवनाथ हा ज्ञानेश्वर गवळी यांचा एकुलता एक मुलगा होता. ऐन सणाच्या दिवशी एकुलता एक मुलगा गेल्याने गावावर शोककळा पसरली.
सख्या भावांचाअंत
चौथी घटना वैजापूर तालुक्यातील वीरगावनजीक घडली. अमोल रमेश रायते (१७) व ऋषिकेश रमेश रायते ( २० ) हे दोघे सख्खे भाऊ दुपारी ३ वाजता कापूस वाडगाव रस्त्यावरील मुर्शिदापूर शिवारातील तलावात बैल धुण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. दोघेही एक दुस-याला वाचविण्याच्या प्रयत्नात गतप्राण झाले. ग्रामस्थांनी दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. या घटनेची वीरगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.