पैठण ( औरंगाबाद ) : पैठण येथील संतपीठाचे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी (१७ सप्टेंबर) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन करण्यात येणार असल्याची माहिती शनिवारी रोजगार हमी तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे ( Sandeepan Bhumare ) यांनी पैठण येथे पत्रकार परीषदेत दिली. १७ सप्टेंबरला उदघाटन व १ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला सुरुवात होणार असल्याचेही मंत्री भुमरे यांनी सांगितले.
संतपीठातून अभ्यासक्रमास प्रारंभ होणार असल्याने वारकरी व भाविकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संतपीठाच्या प्रत्यक्ष कामकाजास सुरवात होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आज रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संतपीठातील भौतिक सुविधांचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, राजीव शिंदे, सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अभियंता राजेंद्र बोरकर, नाथसंस्थानचे विश्वस्त दादा बारे, हभप विठ्ठठलशास्त्री चनघटे, दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, विनोद बोंबले, नगरसेवक भूषण कावसानकर, राजू गायकवाड, किशोर चौधरी, गणेश मडके, यांच्यासह विद्यापीठाचे प्रवीण वक्ते आदी उपस्थित होते.
पाच परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाने सुरुवात १ ऑक्टोबर पासून संतपीठातून वारकरी किर्तन व एकनाथी भागवत हे दोन एक वर्ष कालावधी असलेले परिचय प्रमाणपत्र निवासी अभ्यासक्रम व सहा महिने कालावधी असलेले संत एकनाथ महाराज, ज्ञानेश्वरी व गीता परिचय असे एकूण पाच अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री भुमरे यांनी सांगितले. या अभ्यासक्रमास मिळणारा प्रतिसाद पाहून पुढे सर्वच संतांचा परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
संतपीठाचे तीन विभाग.... अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून संतपीठात संतसाहित्य, तत्त्वज्ञान व संगीत असे तीन विभाग तयार करण्यात आले आहेत. संतसाहित्य विभागातून परिचय प्रमाणपत्र, तत्त्वज्ञान विभागातून पीएचडी, रिसर्च, डिग्री व डिप्लोमा अभ्यासक्रम तर संगीत विभागातून किर्तन प्रवचण आदी अभ्यसक्रम तयार करण्यात आल्याचे विद्यापीठाचे प्रा प्रवीण वक्ते यांनी सांगितले.
वारकरी शिक्षण संस्था सलग्नीकरणासाठी पाठपुरावाराज्यभरात वारकरी संप्रदायाने मोठ्या संख्येने वारकरी शिक्षण संस्था सुरू केलेल्या आहेत. या संस्थांना संतपीठाची सलग्नता द्यावी म्हणून वारकरी संप्रदायाची आग्रही मागणी आहे. वारकरी संस्थांना संतपीठाची सलग्नता देण्यासाठी युजीसी व महाराष्ट्र शासनाची मान्यता घ्यावी लागणार असून या बाबत पालकमंत्री उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व आपण पाठपुरावा करू असे मंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितले.
संतपीठाचा २३ कोटीचा प्रस्ताव राज्यशासनास सादरजिल्हाधिकारी सुनील चव्हाण. संतपीठ हा मोठा व्यापक प्रकल्प असून या संदर्भातील २३ कोटी रूपयाचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. या अंतर्गत चार क्लस्टर क्लासरूम इमारत, जगभरातील संत साहित्य उपलब्ध असलेले सुसज्ज ग्रंथालय आदी भौतिक सुविधांचा समावेश करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले. पुढे चालून संतपीठातून लोकशिक्षण, मूल्यधिष्ठित शिक्षण, व बौध्दिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
अभ्यासक्रम तयार..विद्यापीठाने संतसाहित्याचा अभ्यास असणाऱ्या अभ्यासकाकडून पाच परिचय प्रमाणपत्रचा अभ्यासक्रम तयार केला आहे. या प्रमाण पत्र अभ्यासक्रमासाठी संत साहित्याची आवड व ज्ञान असणाऱ्यांना प्रवेश दिला जाईल असे विद्यापीठाचे प्रा. प्रवीण वक्ते यांनी सांगितले.
सल्लागार समिती स्थापणार....सुरवातीचे पाच वर्ष संतपीठाचा कारभार डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठमार्फत चालणार आहे. त्यानंतर संतपीठ स्वतंत्र कामकाज करेल. दरम्यान, संतपीठासाठी स्थानिक सल्लागार व स्थाई समितीची निवड करण्यात येणार असल्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी स्पष्ट केले. तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर अंतुले यांनी २३ जानेवारी १९८१ रोजी पैठण येथे संतपिठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून पैठणकरासह संत, मंहत व वारकरी संप्रदाय संतपीठ सुरू होण्याच्या प्रतिक्षेत होते. चार वेळेस उदघाटन होऊन सुध्दा संतपीठाच्या कामकाजास प्रारंभ झाला नव्हता. मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यानंतर संदीपान भुमरे यांनी पाठपुरावा केला. तब्बल ४० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर संतपीठ सुरु होत आहे.