औरंगाबाद : केंद्र शासनाने १८ वर्षांवरील सर्वांंना लस देण्याचा निर्णय घेतल्यानंतर औरंगाबाद शहरात तरुणाईकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मागील पाच दिवसांतच सुमारे ६० हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. त्यामुळे शुक्रवारी लसीकरणाने शहरात चार लाखांचा टप्पा पूर्ण केला. दुसरा डोस घेण्यासाठीही नागरिक आता विविध केंद्रांवर गर्दी करीत आहेत.
मनपा प्रशासनाने व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू केली आहे. दररोज १२ ते १४ हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे. मंगळवार, २२ जूनपासून ६९ केंद्रांच्या माध्यमातून १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन केले. २० जूनपर्यंत शहरात तीन लाख ३९ हजार ८२७ जणांचे लसीकरण झाले होते. त्यात १८ ते ४४ वयोगटातील २७ हजार ३०१ नागरिकांनी पहिला डोस घेतलेला होता. २४ जूनपर्यंत तीन लाख ९३ हजार १५३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. त्यात १८ ते ४४ वयोगटातील तरुणांची संख्या ७६ हजार ७६५ एवढी आहे. शुक्रवारी दिवसभरात १४ हजारांपेक्षाही अधिक नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी शहराने चार लाखांच्या लसीकरणाचा टप्पा पार केला. सध्या प्रत्येक केंद्रावर किमान २०० जणांचे लसीकरण केले जात आहे. मनपाने नोंदणी न करताच थेट लस घेण्यासाठी केंद्रावर या, असे आवाहन केल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढल्याचे चित्र आहे.
आता सोसायट्यांमध्ये लसीकरण
शहरातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण जलदगतीने करण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून विविध सोसायट्यांमध्येही लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी लसीकरणाची मोबाइल टीम तयार केली आहे. सोसायटींतील २०० लाभार्थींची यादी सादर केल्यास अशा सोसायटींच्या ठिकाणी पालिकेकडून लसीकरण शिबिर घेतले जाणार आहे.
लसीकरणाचा आलेख
- एक लाखाचा टप्पा : १ एप्रिल
- दोन लाखांचा टप्पा : २४ एप्रिल
- तीन लाखांचा टप्पा : २९ मे
- चार लाखांचा टप्पा : २५ जून