औरंगाबाद : इंग्रजी शाळाचालक विश्वास सुरडकर यांच्या हत्येला पाच दिवस उलटल्यानंतरही पोलिसांना खुनाचा उलगडा करता आला नाही. मृत विश्वास यांनी शाळेचा विकास करण्यासाठी शहरातील अनेक बड्या हस्तींकडून तब्बल पाच ते सात कोटी रुपयांची उचल केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्यांची हत्या आर्थिक देवाण-घेवाणीतून झाल्याचा संशय मृताच्या भावाने केल्यानंतर पोलिसांनी राजू दीक्षितला संशयावरून कोठडीत टाकले.
वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शिक्षण संस्थाचालक विश्वास सुरडकर हे दोन ठिकाणी इंग्रजी शाळा चालवीत. सिडको एन-११ येथील सनराईज इंग्लिश स्कूलची इमारत भाड्याच्या जागेत आहे. या जागेकरिता ते प्रतिमहिना एक लाख रुपये भाडे देत होते. शिवाय शाळेची इमारत त्यांना खरेदी करायची होती. याकरिता त्यांचा जागा मालकासोबत करारही झाला होता.
यासाठी त्यांनी ३५ लाख रुपये संबंधितांना दिल्याचे पोलिसांनी सांगितले. शाळेचा विकास करण्यासाठी विश्वास यांनी त्यांचा चुलतमामा राजू दीक्षित यांच्याकडून ८६ लाख रुपये तर जुबेर मोतीवाला, पुरुषोत्तम अग्रवाल, मोहसीन बिल्डर यांच्यासह एका तहसीलदाराच्या वडिलांकडूनही मोठ्या रकमा घेतल्या होत्या. दीक्षित यांना शाळेत भागीदारी देण्याचा शब्द विश्वास सुरडकर यांनी दिला होता. शिवाय शाळेतून मिळणारे उत्पन्न हे विभागून घेऊ असे सांगितले होते. यामुळे दीक्षित यांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांकडून हात उसने अथवा व्याजाने पैसे आणून ते सुरडकर यांना दिले होते. विश्वास यांनी मात्र त्यांना शाळेत भागीदारी न दिल्याने राजू यांनी त्यांच्याकडे पैशासाठी तगादा सुरू केला.
विश्वास यांनी दिलेले धनादेशही अनादरित झाल्याने राजू यांनी कोर्टात धाव घेतली. एवढेच नव्हे तर पैसे मिळावे, याकरिता गतवर्षी शाळेसमोर उपोषणही केले होते. पोलिसांत वर्षभरापूर्वी राजू आणि विश्वास यांनी गुन्हे शाखेकडे परस्परविरोधात तक्रारी केल्या होत्या. तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या अर्जाची चौकशी केल्याचे तपासात समोर आले. खुनाच्या घटनेला पाच दिवस उलटल्यानंतरही या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
बेगमपुरा पोलिसांचे हाताची घडी अन् तोंडावर बोटविश्वास सुरडकर यांच्या खुनाचा तपास करणाऱ्या बेगमपुरा पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्या दिवसापासून हाताची घडी अन् तोंडावर बोट, अशी भूमिका घेतली आहे. पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी प्रसारमाध्यमांना याविषयी बोलत नाहीत. एवढेच नव्हे तर त्या फोनही घेत नाहीत आणि मेसेजलाही उत्तर देत नाहीत. यामुळे या गुन्ह्याचा उलगडा झाला अथवा नाही, तपासात काही प्रगती आहे का, नाही ही माहिती त्यांच्याकडून मिळत नाही.