औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय स्क्वॅश स्पर्धेत सांघिक गटात महाराष्ट्राने वर्चस्व राखताना १४ व १७ वर्षांखालील मुले व मुली आणि १९ वर्षांखालील मुलांच्या अशा पाच गटांत अंतिम फेरीत धडक मारली आहे.मुलांच्या १४ वर्षांखालील गटातील उपांत्य फेरीत महाराष्ट्राने दिल्लीचा २-० व चंदीगडने आसामचा २-१ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. मुलींच्या गटात महाराष्ट्राने चंदीगडचा २-१, तामिळनाडूने गुजरातचा २-१ असा उपांत्य फेरीत पराभव केला. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राने उपांत्य फेरीत चंदीगडचा २-१ आणि दिल्लीने तामिळनाडूचा २-१ असा पराभव करीत फायनलमध्ये धडक मारली. मुलांच्या गटातही महाराष्ट्राने वर्चस्व राखत तामिळनाडूचा २-१ असा पराभव केला. आता त्यांची अंतिम फेरीतील गाठ ही चंदीगडचा २-१ असा पराभव करणाºया मध्यप्रदेशविरुद्ध होणार आहे.मुलींच्या १९ वर्षांखालील गटात महाराष्ट्राने उपांत्य फेरीत गुजरातवर २-० आणि चंदीगडने तामिळनाडूवर २-० अशी मात करीत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. मुलांच्या गटात तामिळनाडूने महाराष्ट्राचा २-१ असा पराभव केला, तर चंदीगडने गुजरातवर २-१ अशी मात करीत अंतिम फेरी गाठली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रदीप खांड्रे, जिल्हा संघटनेचे सचिव रणजित भारद्वाज, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, लता लोंढे, सचिन पुरी, दीपक भारद्वाज, कल्याण गाडेकर, रोहिदास गाडेकर, सुरेश मोरे, किशोर हिवराळे, सुशील शिंदे, शैलेश देवणे, पवन राऊत, अकीब सिद्दीकी आदी परिश्रम करीत आहेत.
महाराष्ट्राचे पाच गटांत अंतिम फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 1:04 AM