उस्मानाबाद : तीन दिवसांत जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस झाला. या पावसामुळे वीज कंपनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हाभरातील मिळून सुमारे साडेसहाशेवर विद्युत खांब उन्मळून पडले आहेत. तसेच ठिकठिकाणी विद्युत तारा तुटल्याने अनेक गावांना रात्र अंधारात काढावी लागली. रविवारी दिवसभर ठिकठिकाणचा विद्युतपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू होते.जिल्हा भीषण दुष्काळाचे चटके सोसत असतानाच मागील तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपले. यामध्ये शेकडो घरांची पडझड झाली आहे. ठिकठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत. तसेच विजा पडून बऱ्याचप्रमाणात जनावरेही दगावली आहेत. दरम्यान, वादळी वाऱ्याचा फटका वीज कंपनीलाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. जोराच्या वाऱ्यामुळे चक्क लोखंडी विद्युत खांब वाकले आहेत. सिमेंटचे खांब तर अक्षरश: मोडून पडले आहेत. यामध्ये मोठ्या लाईनचे सुमारे १९० तर लहान लाईनचे ४५० पेक्षा अधिक खांब उन्मळून पडले आहेत. दरम्यान, काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांना रात्र अंधारात काढावी लागली. दरम्यान, रविवारी सकाळपासून वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही हाती घेतली. ही कार्यवाही कमी वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी जवळपास सहा ‘एजन्सीज’ला जिल्ह्यात पाचारण करण्यात आले आहे. तसेच वीज कंपनीचे नियमित कर्मचारीही कार्यरत आहेत. सायंकाळपर्यंत अनेक गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.३६ तासानंतर वीजपुरवठा सुरळीतउस्मानाबाद तालुक्यातील वडगाव सिद्धेश्वर परिसरात अनेक ठिकाणी विद्युतवाहक तारा तुटल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वीजपुरवठा बंद झाला होता. त्यावर शनिवारी सकाळी तासभर वीजपुरवठा झाला. त्यानंतर खंडीत झालेला वीजपुरवठा रविवारी सकाळी पूर्ववत झाला.वादळी वाऱ्यामुळे वीज कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठ्या विद्युत वाहिनीचे १९० तर लहान वाहिनीचे साडेचारशेवर विद्युतखांब कोसळले आहेत. दुरूस्तीचे काम लागलीच हाती घेण्यात आले आहे. रविवारी दिवसभर काही गावांचा वीजपुरवठा सुरळीत केल्याचे वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता गुप्ता यांनी सांगितले.उस्मानाबाद शहरातील रामनगरसह अन्य भागातील वीजपुरवठा शनिवारी रात्री बंद झाला होता. तो रविवारी दुपारनंतर सुरळीत झाला. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागले.
साडेसहाशे विद्युत खांब उन्मळून पडले !
By admin | Published: June 06, 2016 12:16 AM