पिशोर : नळजोडणीच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. याबाबतची तक्रार दाखल करुन आल्यानंतर पुन्हा पंधरा ते सोळाजणांनी केलेल्या हल्ल्यात पाचजण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिशोर येथील झोपडपट्टी भागात नळजोडणीच्या कारणावरून शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हाणामारी झाली होती. यात सलीम महमूद पठाण हे जखमी झाले होते. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून पिशोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची तक्रार दाखल करून महमूदखा दौलतखान पठाण हे इतर चारजणांसोबत जेवणासाठी दुचाकीवरुन झोपडपट्टीत जात होते. यावेळी सिल्लोड नाक्यावर १५ ते १६ जणांच्या गटाने त्यांना अडवून त्यांच्यावर हल्ला केला. यात हाफिज अय्युबखा पठाण, फुजेल महमूद पठाण यांच्या डोक्याला तर महमूद दौलत पठाण, आसिफ वाहिद पठाण, महमूद चांदखा पठाण व महमूद दौलत पठाण हे जखमी झाले. याबाबत माहिती मिळताच पिशोर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिशकुमार बोराडे, उपनिरीक्षक विजय आहेर, सतीश फड, सहाय्यक फौजदार माधव जरारे, परमेश्वर दराडे, संदीप कणकुटे, शिंदे, शिवदास बोर्डे, तट्टू पाटील, सोनवणे आदींनी जखमींना पिशोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने फुजेल पठाण व हाफिज पठाण यांना औरंगाबादमधील घाटीत हलविले आहे. महमूद दौलतखा पठाण यांच्या फिर्यादीवरून सोळाजणांविरुद्ध पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बाराजणांना ताब्यात घेऊन कन्नड न्यायालयापुढे हजर केले असता, सर्वांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली.