औरंगाबाद : बायजीपुरा परिसरातील इंदिरानगर येथील एका घराची भिंत गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात पडली. या घटनेत दोन बालिकांसह पाच जण जखमी झाले आहेत. त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.फरजाना शेख सलीम (४५), शेख सीमा शेख हलीम (३०), हुमा शेख हलीम (६) आणि मसिरा शेख सलीम (५), सर्व रा. इंदिरानगर, बायजीपुरा, अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, इंदिरानगर येथील सिकंदर हॉल या मंगल कार्यालयाशेजारी शेख समीर शेख सत्तार यांच्या मालकीचे घर आहे. या घराशेजारी फरजाना आणि त्यांचा परिवार राहतो. समीर यांच्या घराची जुनी भिंत पडायला आलेली आहे. त्यामुळे फरजाना आणि त्यांच्या नातेवाईकांनी समीर यांना ही भिंत पाडून टाकावी; अथवा तिची दुरुस्ती करण्याचे वारंवार सांगितले. शेख समीर यांच्या परिवाराने याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी जोरदार वादळ सुरू झाले. याप्रसंगी जखमी झालेले सर्व जण घराबाहेर बसलेले होते. वादळ आल्यामुळे ते सर्व जण घरी जात असतानाच समीर यांच्या घराची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. या घटनेत फरजाना यांच्या डोक्याला, हाताला, तर सीमा यांच्या पाठीला जबर दुखापत झाली. चिमुकल्यांचे डोके फुटल्याने तेही रक्तबंबाळ झाले. घटनेनंतर माजी नगरसेवक डॉ. जफर खान आणि इतर लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद जिन्सी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
बायजीपुऱ्यात भिंत कोसळून ५ जखमी
By admin | Published: May 20, 2016 12:32 AM