औरंगाबाद : महापालिकेने सातारा-देवळाई भागात नवीन पाच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेत विद्यार्थी मिळतील का, यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, पाच वॉर्ड गृहित धरून शाळा सुरू करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. शिक्षण विभागाने प्रशासकांच्या आदेशानुसार सात दिवसांपासून सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. पाच शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. ज्या भागात जास्त विद्यार्थी तेथे प्राधान्याने शाळा सुरू केली जाईल. सर्वेक्षणासाठी बाळासाहेब जाधव, आसाराम जाधव, वैशाली चव्हाण, मोनिका चव्हाण हे शिक्षक परिश्रम घेत आहेत. २०१६ साली शहराला जोडून असलेला सातारा-देवळाईचा भाग महापालिकेत समाविष्ट झाला. त्यावर्षी ५२ हजार लोकसंख्या होती. तेथे निवडणुकीसाठी दोन वॉर्ड तयार करून पोटनिवडणूक घेण्यात आली. एप्रिल २०२० मध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने त्या भागात पाच वॉर्ड तयार करण्यात आले. पाच वॉर्ड डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक वॉर्डात एक शाळा सुरू करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्या भागात शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही.
सातारा-देवळाईत महापालिकेच्या नवीन पाच शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:04 AM