औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी रविवारी (दि.३०) मुलाखती पार पडल्या. या मुलाखतीसाठी आमंत्रित १८ पैकी १७ इच्छुकांनी हजेरी लावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मुलाखतीनंतर शोध समितीने कुलपती सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाच जणांची नावे बंद लिफाफ्यात सोमवारी सादर केली.
विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या निवडीसाठी कुलपतींनी न्यायमूर्ती अतुल दवे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय शोध समिती स्थापन केली होती. यात मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, दिल्ली येथील एनआयटीचे संचालक प्रवीण कुमार यांचा समितीत समावेश आहे. या पदासाठी १२६ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १८ जणांची नावे मुलाखतीसाठी निवडण्यात आली होती. यामध्ये डॉ. के. व्ही. काळे, डॉ. किशोर देशमुख, डॉ. प्रमोद येवले, डॉ. विजय फुलारी, डॉ. विनोद श्रीवास्तव, डॉ. राजेंद्र अवस्थी, डॉ. धनंजय माने, डॉ. कुं डल प्रदीप, डॉ. गोवर्धन खाडेकर, डॉ. गणेशचंद्र शिंदे, डॉ. रघुनाथ होळंबे, डॉ. दत्ता खंदारे, डॉ. लक्ष्मण वाघमारे, डॉ. अशोक चव्हाण, डॉ. संजीव सोनवणे, डॉ. विवेक देवळाणकर, डॉ. शकील अहमद, डॉ. प्रदीपकुमार शर्मा यांचा समावेश होता. निवडलेल्या उमेदवारांची मुंबईतील चर्चगेट येथील सौ. नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाच्या परिसरात रविवारी मुलाखत घेण्यात आली.
या मुलाखतीसाठी जोधपूर येथील डॉ. शर्मा गैरहजर होते. या समितीने निवडलेल्या पाच उमेदवारांची नावे सोमवारी दुपारी १२ वाजता कुलपती सी. विद्यासागर राव यांना बंद लिफाफ्यात सुपूर्द केली. यानंतर कुलपती कार्यालयातील शिक्षण विभागाच्या उपसचिव उज्ज्वला दांडेकर यांनी सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास शोध समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांना मेलसह एसएमएस पाठवून शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता राजभवनात मुलाखतीसाठी निमंत्रित केले आहे. कुलपती सी. विद्यासागर राव त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर एकाची निवड केली जाईल.
अंतिम पाचमध्ये निवड झालेले उमेदवारविद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी शोध समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी बीसीयूडी संचालक डॉ. के.व्ही. काळे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे संचालक डॉ. धनंजय माने, कोल्हापूर येथील भौतिकशास्त्राचे डॉ. विजय फुलारी, नांदेड येथील गुरुगोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रघुनाथ होळंबे आणि नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.