वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावरील एएस क्लब चौकात सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास खाजगी बस व कंटेनरचा अपघात झाला. यात बसमधील क्लिनरसह ४ प्रवासी जखमी झाले असून, इतर प्रवाशांना कोणतीही इजा न झाली नाही. बसचा वेग कमी असल्याने अनर्थ टळला.
वैष्णवी ट्रान्सपोर्टची खाजगी बस (एमएच-४०, वाय- ६९०२) ही रविवारी रात्री जळगावहून औरंगाबाद मार्गे पुण्याला ३० प्रवासी घेवून निघाली. दरम्यान, दिल्लीहून वाळूज मार्गे सोलापूरकडे जाणाऱ्या कंटेनरने (आरजे१४-जीडी३७६८) सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास अचानक एएस क्लब चौकातून पैठण लिंकरोडकडे वळण घेतले. त्याचवेळी बसचालक कैलास खंदारे याने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियंत्रण सुटल्याने बस कंटेनरवर आदळली.
यात बसच्या कॅबिनमध्ये बसलेले क्लिनर वैभव उर्फ गणेश मराठे व अन्य ४ प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांची नावे समजू शकली नाहीत. तर बसची समोरील काच पूर्णपणे तुटली असून, कॅबिनचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेत जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले. बसचा वेग जास्त असता तर मोठी दुर्घटना घडली असती, असे नागेश कुकलारे या प्रत्यक्षदर्शीने सांगितले.