औरंगाबाद : दोन मुलींच्या पाठीवर पुन्हा मुलगीच जन्मली. छोटा हत्ती गाडी खरेदी करण्यासाठी माहेराहून पैसे आणले नाहीत. या सर्व कारणांवरून राधा संतोष त्रिभुवन या विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिच्या पतीसह सासरच्या पाच जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पठाण यांनी १ जून २०१६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मुली झाल्यामुळे राधाचा पती संतोष तिला मारहाण करीत होता. छोटा हत्ती गाडी खरेदी करण्यासाठी राधाच्या माहेरच्या लोकांनी जावयाला एक लाख रुपये दिले होते. त्यानंतरही त्यांच्याकडून अधूनमधून पैशांची मागणी होत होती. यामुळेसुद्धा राधाच्या छळात भर पडली. हा छळ असह्य झाल्यामुळे राधाने गळफास घेऊन गुरुवारी आत्महत्या केली. तत्पूर्वी तिने तिच्या प्रांजल, राजनंदिनी आणि कोमल या तिन्ही मुलींचा खून केल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आले. राधाची आई शोभा जाधव यांच्या फिर्यादीवरून सातारा पोलिसांनी राधाचा पती संतोष, सासू कमलबाई, सासरा किसन, भाया अशोक, जाऊ वर्षा आणि नंदोई संजीव भुसाळे यांच्याविरुद्ध राधाचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. संजीव भुसाळे फरार असून, उर्वरित पाच जणांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. सरकारी वकील बी. एम. राठोड यांनी न्यायालयास विनंती केली की, संजीव भुसाळे फरार आहे. त्याला अटक करावयाची आहे. राधाच्या पतीला गाडी घेण्यासाठी राधाच्या माहेरच्या लोकांनी पैसे दिल्याचे रेकॉर्ड हस्तगत करावयाचे आहे. गुन्हा गंभीर असून, व्याप्ती मोठी आहे. आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती राठोड यांनी केली. सुनावणीअंती न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पाच जणांना ‘पीसीआर’
By admin | Published: May 27, 2016 11:15 PM