औरंगाबाद : शहराची तहान भागविणाऱ्या १४०० मि.मी. जलवाहिनीवर फारोळ्यात शनिवारी मध्यरात्री १.३० वाजता अचानक बिघाड निर्माण झाला. पॅनल बोर्डची अर्थिंग निकामी झाल्याने सर्व पाच पंप बंद पडले. तातडीने महापालिका अधिकाऱ्यांनी तज्ज्ञांना बोलावून दुरुस्ती केली. त्यामुळे रविवारी शहरातील अनेक वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागला.
जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने मनपाला फ्लोटिंग पंप लावून अक्षरश: गाळातून पाणी ओढावे लागत आहे. धरणात लवकरात लवकर पाणी न आल्यास शहरात पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. जायकवाडी धरण क्षेत्रातही मागील एक महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. मनपा प्रशासन मोठी तारेवरची कसरत करीत शहरातील नागरिकांची तहान भागवत आहे.
शुक्रवारी दिवसभर पाणीपुरवठा विभागाने शटडाऊन घेऊन दुरुस्तीची तब्बल ४९ कामे केली. शनिवारी पहाटे ४ वाजेपासून शहरात पाणी आणण्याची प्रक्रिया सुरू होती. रात्री १.३० वाजता अचानक फारोळ्यात अर्थिंगमध्ये बिघाड निर्माण झाला. शहराला पाणीपुरवठा करणारी १४०० मि.मी. व्यासावरील सर्व पाच पंप बंद पडले. घटनेची माहिती मिळताच मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, यांत्रिकी विभागाचे बाबूराव घुले आदी घटनास्थळी दाखल झाले.
तज्ज्ञ इलेक्ट्रिशियन बोलावून दुरुस्तीचे काम सुरू केले. यामध्ये दोन ते तीन तासांचा वेळ लागला. पहाटे साडेचार वाजता पंप सुरू करण्यात आले. शहरात पाणी आणण्यास आणखी विलंब निर्माण झाला. फारोळ्यातील बिघाडामुळे रविवारी ज्या वसाहतींना पाणी देण्यात येणार होते, त्यांना पाणी देता आले नाही. आता सोमवारी मनपा या वसाहतींना पाणी देणार आहे.
निवृत्तीच्या रात्रीही दिली सेवामनपाच्या यांत्रिकी विभागातील इलेक्ट्रिशियन दिलीप सोमवंशी ३० जून रोजी निवृत्त होत आहेत. मनपाच्या पाणीपुरवठा विभागात विजेचा कुठेही बिघाड असल्यास अवघ्या काही मिनिटांमध्ये तो शोधून त्यावर त्वरित उपाययोजना करण्यात सोमवंशी यांचा विशेष हातखंडा आहे. शनिवारी मध्यरात्री फारोळ्यात बिघाड झाल्याचे कळताच सोमवंशी त्वरित पोहोचले. त्यांनी बिघाड शोधून त्वरित दुरुस्तीही करून दिली. निवृत्तीच्या उंबरठ्यावरही त्यांनी दिलेल्या सेवेचे मनपा अधिकाºयांनी कौतुक केले.