औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र थांबायला तयार नाही. शहर पोलीस मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या बंदोबस्तात व्यग्र असल्याची संधी साधून चोरट्यांनी नवा मोंढ्यातील तीन तर जुन्या मोंढ्यातील दोन दुकानांचे शटर उचकटून गल्ल्यातील रोख रक्कम चोरून नेली. चार चोरटे घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले.
पोलिसांनी सांगितले की, जुना मोंढा येथील धनलक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचे मालक संतोष जैन यांनी मंगळवारी रात्री दुकान बंद केले आणि ते घरी गेले. नंतर रात्री केव्हा तरी चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील दोन हजार रुपये लांबवले. या दुकानाशेजारीच पारस इंटरप्रायजेस हे पत्रावळी विक्रीचे दुकान आहे. शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. मात्र, गल्ल्यात केवळ २५० रुपये होते. ही रक्कम घेऊन चोरटे तेथून निघून गेले. यासोबत राजाबाजारकडे जाणाऱ्या नवा मोंढा येथील झांबड हाईट्समधील राज ट्रेडिंग कंपनीच्या गोडावूनचे शटर चोरट्यांनी उचकटले. या गोडावूनमध्ये किमती मशिनरी होती. मात्र, येथील कोणत्याही वस्तूला चोरट्यांनी हात लावला नाही.
या गोडावून शेजारीच सतीश दरगड यांची साई गॅस एजन्सी आहे. शटर उचकटून गल्ल्याचे ड्रावरचे लॉक उचकटून ८ ते ९ हजार रुपयांची रोकड चोरली. तळमजल्यावर दीपक जनरल स्टोअर्सचे शटर चोरट्यांनी उचकटून २० ते २५ हजार रुपये गल्ल्यातून उचलले. यातील १० ते १२ हजारांची दहा रुपये, पाच रुपये, एक रुपया आणि दोन रुपये चिल्लरची नाणी एका पिशवीत ठेवली होती. चोरट्यांनी ही रक्कम नेली. घटनेची माहिती क्रांती चौक आणि सिटी चौक पोलीस ठाण्यांना कळविण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे, हवालदार मुनीर पठाण, काळे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
चिल्लर दिली अनोळखी मुलाने आणूनदीपक जनरल स्टोअरचे मालक संजय इसरानी यांच्या म्हणण्यानुसार ते बुधवारी दुपारी दुकानात असताना एक अनोळखी मुलगा चोरीला गेलेल्या चिल्लरची बॅग घेऊन आला. ही तुमची बॅग रिक्षात होती असे तो म्हणाला आणि बॅग देऊन निघून गेला. चोरीला गेलेली ही बॅग आणि त्यातील नाणी ‘जैसे थे’ होती. हे पाहून पोलीसही चक्रावले.
चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदचार चोरटे झांबड हाईटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. छायाचित्रण पोलिसांनी हस्तगत करून चोरट्यांचा शोध सुरू केला.