औरंगाबाद : जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १५ पेक्षा कमी झाली आहे. यातही पाच तालुक्यांत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या एकेरी आकड्यात आली आहे. या तालुक्यांची कोरोनामुक्तींकडे वेगाने वाटचाल सुरू आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्वप्रथम दौलताबादेत कोरोना रुग्ण सापडला होता. त्यानंतर ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या १० महिन्यांत ग्रामीण भागांत आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजारांवर गेली आहे. यात सर्वाधिक रुग्णसंख्या ही औरंगाबाद आणि गंगापूर या दोन तालुक्यांमध्ये आढळली आहे. त्यातही रुग्णसंख्येत औरंगाबाद तालुक्याचा पहिला क्रमांक लागतो. सर्वात कमी रुग्ण हे सोयगाव तालुक्यात आढळले. गेल्या काही दिवसांत निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे फुलंब्री, खुलताबाद, सोयगाव, गंगापूर, कन्नड हे पाच तालुके लवकरच कोरोनामुक्त होण्याची चिन्हे आहेत. सध्या ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या पाहता याठिकाणी आगामी काही दिवसात एकही रुग्ण राहणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोना ग्राफी
१)पूर्वी बाधित होण्याचे प्रमाण-७.७५ टक्के
२)सध्या बाधित होण्याचे प्रमाण-३.८ टक्के
३)रुग्ण बरे होण्याचे प्रमाण-९६.५३ टक्के
४) मृत्युदर-२.६३ टक्के
५)आतापर्यंत झालेल्या चाचण्या- ६९,३५७
तालुक्यानिहाय ॲक्टिव्ह रुग्ण
तालुका -ॲक्टिव्ह रुग्ण
औरंगाबाद-१२
फुलंब्री-६
गंगापूर-७
कन्नड-९
खुलताबाद-४
सिल्लोड-१०
वैजापूर-१४
पैठण-१२
सोयगाव-१
--
बरे झालेले रुग्ण-४४, ७११
उपचार घेणारे रुग्ण-३८४
मृत्यू-१२२१
---
लवकरच कोरोनामुक्त तालुके
फुलंब्री, खुलताबाद, सोयगाव,गंगापूर, कन्नड हे पाच तालुके लवकरच कोरोनामुक्त होण्याची चिन्हे आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके म्हणाले, ग्रामीण भागात सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या फार कमी आहे. शिवाय रोज निदान होणाऱ्या रुग्णांची संख्याही घटली आहे. त्यामुळे लवकरच सर्व तालुके कोरोनामुक्त होतील, अशी आशा आहे.