लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: संपूर्ण शहराच्या आरोग्याचा प्रश्न असलेल्या शहर स्वच्छतेसाठी देशभरातून पाच निविदा प्राप्त झाल्या असून या निविदांची तांत्रिक तपासणी केली जात आहे. तांत्रिक तपासणीनंतर कंत्राटदारांनी टाकलेले दर उघडले जातील. या प्रक्रियेमुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न महिनाभरात मार्गी लागेल, असा विश्वास आयुक्त गणेश देशमुख यांनी व्यक्त केला आहे.महापालिकेच्या स्वच्छतेच्या कामासाठी मागविलेल्या निविदा गुरुवारी उघडण्यात आल्या. देशभरातून पाच निविदा कचरा उचलण्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये बंगळुरुच्या पी. गोपीनाथ रेड्डी, स्वच्छता कॉर्पोरेशन, अमरावतीच्या बी. के. एन. एन. एस., गुजरातमधील अंकलेश्वरच्या माधव एंटरप्राईजेस आणि मुंबईच्या आर. अँड बी. इन्फो लि. या पाच कंत्राटदारांचा समावेश आहे.निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची तपासणी महापालिकेने सुरु केली आहे. सर्व तांत्रिक बाबींची तपासणी करण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर कंत्राटदाराने टाकलेले दर उघडण्यात येतील. आता दर निश्चितीनंतर शहर स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागणार आहे.शहरातील स्वच्छतेचे काम पाहणाºया कंत्राटदाराने ३१ मार्च रोजी काम सोडल्यानंतर शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला होता. तत्कालीन आयुक्तांनी कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता कंत्राटदारास कार्यमुक्त केले होते. परिणामी शहरात कचरा उचलण्यास आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध झाले नाही. महापालिकेने अखेर आपल्या प्रतिनियुक्तीने ‘साहेब’ झालेल्या स्वच्छता मजुरांना मूळ कामावर पाठविले. यातील किती जण प्रत्यक्ष कामावर गेले हा संशोधनाचा विषय आहे. दरम्यान, स्वच्छतेचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देत निविदा काढण्याचे आदेश दिले. मात्र आवश्यक तेवढ्या निविदा प्राप्त झाल्या नाहीत.परिणामी या निविदांना पाच वेळा मुदतवाढ दिली. त्यावेळी कुठे तीन निविदा आल्या. या कंत्राटदाराला महापालिकेने चर्चेसाठी बोलाविले. यातील तीन कंत्राटदारापैकी अमृत एंटरप्राईजेसने सर्वात कमी दर टाकला होता. चर्चेसाठी आल्यावर मात्र सदर कंत्राटदाराने निविदेमध्ये टाकलेला दर हा व्यवस्थापकाच्या चुकीने कमी पडल्याचे सांगून निविदेतून माघार घेतली होती.ऐनवेळी निविदा प्रक्रियेतून माघार येणाºया अमृतची इसारा रक्कम जप्त करण्याची कारवाई करण्यात आली होती. तब्बल ५० लाख रुपये जप्त करुन त्यांना काळ्या यादीतही टाकण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया करण्यात आली होती. तत्पूर्वी फेब्रुवारीमध्येही एक निविदा काढण्यात आली होती. मात्र या निविदेत दोनच निविदा आल्याने ही प्रक्रिया पुढे सरकली नव्हती. आता प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
स्वच्छतेसाठी देशभरातून पाच निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:29 AM