औरंगाबाद : अमळनेरकर महाराज सेवा संघातर्फे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्यात आज सुमारे पाच हजार भाविकांनी अभंग गाथेचे वाचन केले. यावेळी भाविकांना जागेवरच गाथेचे वाटप करण्यात आले. आज सोमवारी सप्ताहाचा पहिला दिवस होता. २६ मेपर्यंत चालणार्या या सप्ताहामध्ये दररोज काकडा भजन, सकाळी विष्णुसहस्रनाम, दुपारी गाथा पारायण, सायंकाळी हरिपाठ व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जीवनचरित्र, असे कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर रात्री ८ ते १० या वेळेत हरिकीर्तन पार पडेल. आज दिवसभराचा दिनक्रम मोठ्या संख्येने जमा झालेल्या भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने पार पडला. बळीराम पाटील विद्यालयात चालू असलेल्या या सप्ताहातील भाविकांसाठी चहा, फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. सप्ताहाचा परिसर भक्तिमय करण्यासाठी विविध संत मंडळींच्या मंदिरांचे देखावेदेखील या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. यामध्ये कृष्ण मंदिर (जनाबाई जाते दळताना), गोरा कुंभार, संत तुकाराम, नामदेव महाराज, रुख्मिणी, एकनाथ महाराज, गजानन महाराज, संत सावतामाळी, पांडुरंगाचे भव्यदिव्य मंदिर त्याचबरोबर सखाराम महाराज अमळनेरकर यांच्या संस्थानाचा हुबेहूब देखावा साकारण्यात आला आहे. अशा गाथा पारायणामध्ये केलेल्या अभंग गाथेच्या वाचनाने आध्यात्मिक व पारमार्थिक आनंद लुटणे शक्य होते. यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद लुटत चला, असा संदेश सखाराम महाराज अमळनेरकर यांनी यावेळी दिला. यावेळी प्रसाद महाराज, चातुर्मास महाराज, दादामहाराज, शिरवडकर आदींची उपस्थिती होती. पहिल्या दिवशीच्या गाथा वाचन पारायणात एकूण ४,०९२ अभंगांपैकी प्रत्येकी ६४० अभंगांचे वाचन करण्यात आले.
पाच हजार भाविकांनी केले गाथा पारायण
By admin | Published: May 20, 2014 1:19 AM