कायगाव : परिसरातील फक्त ३ गावांतील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळाली. उर्वरित ५ गावांतील शेतकऱ्यांच्या तोंडाला प्रशासनाने पाने पुसली असून शेतकरी आता नुकसानभरपाई मिळावी, यासाठी आंदोलन करणार आहेत.
परिसरातील कायगाव, अंमळनेर, लखमापूर, गणेशवाडी, भेंडाळा, गळनिंब, अगरवाडगाव, भिवधानोरा आणि धनगरपट्टी शिवारात यंदा मुसळधार पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे जवळपास सगळ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
परिसरातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, भुईमूग, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसाचे प्रमाण एवढे जास्त होते की, महिना महिना शेतातील पाण्याचा निचरा झाला नाही. अनेक शेतकऱ्यांचे कापसाचे उभे पीक सुकून गेले. काहींची पिके पिवळी पडली. कापसाचे पाते गळून पडले. पुढे भावही कमी मिळाला. त्यामुळे मोठा खर्च केलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही हातात आला नाही.
नुकसानभरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी ओरड केल्यानंतर प्रशासनाने पंचनामे केले. मात्र, आता ४-५ महिने उलटले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई मिळालेली नाही. गळनिंब, अगरवाडगाव आणि लखमापूर या तीन गावांतील काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले. उर्वरित कायगाव, गणेशवाडी, अंमळनेर, भेंडाळा, भिवधानोरा आदी भागांतील शेतकरी अजूनही नुकसान भरपाईपासून वंचित आहेत.
शासनाने प्रतिहेक्टरी १० हजार रुपये नुकसानभरपाई दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार असल्याचे जाहीर केलेले होते. मात्र, आता या प्रक्रियेला खूपच उशीर होत असल्याने आधीच संकटात सापडलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी कायगाव भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
कोट :
अतिवृष्टीमुळे कायगाव भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, प्रशासन ४ महिन्यांनंतरही शेतकऱ्यांना मदत देऊ शकत नाही, हे प्रशासनाचे अपयश आहे. तात्काळ कार्यवाही करून शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर आंदोलन उभारू.
- भाऊसाहेब शेळके, शेतकरी
कोट
पहिल्या टप्प्यात आलेल्या बजेटमध्ये काही गावांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात पुन्हा बजेट आल्यावर उर्वरित गावांतील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
- अविनाश शिंगटे, तहसीलदार, गंगापूर.