वाळूज महानगर : महावितरणच्या जोगेश्वरी सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जोगेश्वरी, घाणेगाव, विटावा, एकलेहरा, नांदेडा ही पाच गावे दोन दिवसांपासून अंधारात आहेत. महावितरणने गुरुवारी रात्रीपासून दुरुस्तीचे काम हाती घेल्याने शुक्रवारपासून टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे.
महावितरणच्या वाळूज सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या जोगेश्वरी परिसरात सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी जोगेश्वरी येथे स्वतंत्र सबस्टेशन फीडर उभारले आहे. जोगेश्वरी फीडरवरून जोगेश्वरी, घाणेगाव, विटावा, एकलहेरा, नांदेडा या पाच गावांतील जवळपास दहा हजार ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो. बुधवारी वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर या फीडरवरून वीजजोडणी देण्यात आली होती. अशातच दुपारी २ वाजेच्या सुमारास या पाच गावांतील वीजपुरवठा खंडित झाला. वीज गायब झाल्याने गावातील पिठाच्या गिरण्या, शेतातील विद्युतपंप, ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा करणारे विद्युतपंप बंद पडल्याने नागरिक, शेतकरी व ग्राहकांना त्रास सहन करावा लागला. घाणेगावात विटावा येथून वीजपुरवठा करण्याची मागणी माजी सरपंच सुधाकर गायके, सोपान सातपुते, ज्ञानेश्वर मालकर, विनोद काळवणे, सुरेश गायकवाड, सागर सातपुते आदींनी केली आहे.
१८ तासांनंतर वीजपुरवठा सुरू
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता रवींद्र गायकवाड, सहायक अभियंता प्रणीत खंडागळे, मुख्य तंत्रज्ञ सचिन केळकर, शिंदे, शेख शौकत, सोळस आदी कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी गुरुवारी युद्धपातळीवर काम सुरू केले होते. आज शुक्रवारी जवळपास १८ तासांनंतर दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर या फीडरवरून टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे सहायक अभियंता प्रणीत खंडागळे यांनी सांगितले.
-----------------------------