औरंगाबाद : कंपनीत गुंतवणूक केल्यास मिळणाऱ्या नफ्यात भागीदारी देण्याचे आमिष दाखवून हैदराबादेतील हिरा ग्रुप कंपनीने शहरातील पाच महिलांना ८ लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात कंपनीच्या मुख्य प्रवर्तक महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. नौहिरा शेख (रा. हैदराबाद) हिरा ग्रुप कंपनीची सीईओ तथा मुख्य प्रवर्तक संशयित आरोपीचे नाव आहे.
कंपनीत पैसे गुंतविल्यास होणाऱ्या नफ्यात भागीदारी देऊ आणि दरमहा बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल, असे आमिष दाखवून हैदराबादेतील हिरा ग्रुप कंपनीने औरंगाबाद शहरातील अनेकांना गुंतवणूक करायला लावली होती. २१ नोव्हेंबर २०१३ ते २३ जुलै २०१८ या कालावधीत पानदरिबा येथील दुरेशहवर मुबशीर हुसेन (७५) यांनी २ लाख रुपये, निलोफर फातेमा काझी वहिदोद्दीन (रा. शहागंज) यांनी १ लाख १० हजार रुपये, सय्यद अब्दुल वहाब (रा.सादातनगर) यांनी १ लाख २५ हजार रुपये, सय्यद महेरूख फातेमा यांनी ४ लाख १० हजार रुपये तर असरत फातेमा यांनी ५० हजार रुपये, असे एकूण ८ लाख ८५ हजार रुपये हिरा ग्रुपमध्ये गुंतविले. मात्र, कंपनीने करारानुसार नफ्याचा हिस्सा त्यांच्या बँक खात्यात जमा केला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी कंपनीला ई-मेल पाठवून त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत मागितली. त्यावेळी नौहिरा शेख यांनी ई- मेल द्वारे छायांकित प्रत देऊन तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, असे सांगितले.