संतोष हिरेमठ
औरंगाबाद : मुंबई ते नागपूर (व्हाया औरंगाबाद) हायस्पीड रेल्वेचा विषय पुन्हा एकदा समोर आला असला तरी या रेल्वेच्या चर्चेतच मागची पाच वर्षे गेली आहेत. कधी हायस्पीड तर कधी बुलेट ट्रेन धावणार असल्याचे सांगितले जाते; मात्र जिथे दुहेरीकरणाच्या प्रतीक्षेत २० वर्षे लोटली, तिथे बुलेट ट्रेन प्रत्यक्षात कधी धावणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
हायस्पीड रेल्वेमुळे औरंगाबादहून मुंबईपर्यंतचा प्रवास अवघ्या दोन तासांत शक्य होणार आहे; मात्र हे दिवास्वप्नच ठरत आहे. भारतीय रेल्वे आणि स्पेन रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे काॅरिडाॅर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १० मार्च २०१६ रोजी स्पेनमधील अधिकारी जे. जे. ओटोरिओ, एफ. जे. डी. साॅब्रोनो, अल्बट्रो ओट्रेगा माॅस्टिरिओ आणि कार्लोस ॲपॅरिशियो यांनी औरंगाबाद रेल्वेस्टेशनला भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी काॅरिडाॅरमध्ये औरंगाबादचा समावेश होण्यासाठी सर्व बाबी अनुकूल असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आगामी काही वर्षात औरंगाबादमार्गे २०० ते ३०० कि.मी. वेगाने अतिजलद रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा झाला आणि औरंगाबादहून नागपूर, मुंबई अवघ्या दोन तासात गाठणे लवकरच शक्य होईल, असे म्हटले गेले. पण पाच वर्षे लाेटली तरी अजूनही हीच बाब वारंवार सांगितली जात आहे.
कधी औरंगाबाद वगळले, कधी समावेश
हायस्पीड रेल्वे प्रकल्पातून औरंगाबाद वगळण्यात आल्याचा गतवर्षी मुद्दा समोर आला. तेव्हा सप्टेंबर २०२० मध्ये खा. इम्तियाज जलील यांनी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांची भेट घेतली. तेव्हा पर्यटन आणि उद्योगांचे प्रमुख केंद्र म्हणून रेल्वेला औरंगाबादचे महत्त्व माहीत आहे. त्यामुळे
मुंबई - नागपूर हायस्पीड रेल्वे प्रकल्पातून औरंगाबाद वगळले जाणार नाही, अशी माहिती रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी खा. जलील यांना दिली.
गेल्या २० वर्षांपासून प्रतीक्षा
रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची गेल्या २० वर्षांपासून प्रतीक्षा करावी लागत आहे. पण अजूनही काम झालेले नाही. मग हायस्पीड किंवा बुलेट ट्रेन कधी धावणार, असा प्रश्न आहे. मुंबईत दीड तासांत पोहोचू तेव्हा पोहोचू, पण आजघडीला प्रवाशांसाठी साध्या पॅसेंजर रेल्वेही सुरु नाहीत.
- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती
------
फोटो ओळ..
हायस्पीड रेल्वेच्या दृष्टीने १० मार्च २०१६ रोजी रेल्वेस्टेशनवर पाहणी करण्यासाठी आलेले स्पेनचे अधिकारी.