- पुरूषोत्तम करवामाजलगाव: राज्यातील राजकीय भूकंपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीतील जास्तीतजास्त आमदारांना आपल्या गोटात घेण्याच्या प्रयत्नात आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांनी माजलगावचे आ. प्रकाश सोळंके यांच्याशी देखील संपर्क केला. सोळंके यांनी कोणासोबत राहायचं याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, आ. सोळंके यांनी मंत्रीपद व येत्या विधानसभेसाठी उमेदवारी फिक्स करण्याची अट अजित पवारांसमोर ठेवणार असल्याची माहिती आ.सोळंकेंच्या गोटातून मिळाली आहे.
पंधरा वर्षांपूर्वी अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवून भाजपाला सोडचिठ्ठी देत माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ. सोळंके यांना राज्यमंत्रीपद देखील दिले. परंतु अडीच वर्षानंतर त्यांचे मंत्रीपद काढण्यात आले होते. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २०१९ साली आ. सोळंके पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. यावेळी स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचे सरकारमध्ये मंत्रिपद मिळावे यासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा देखील देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांना मंत्रिपद मिळाले नव्हते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला संपर्क राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे रविवारी शिंदे - फडवणीस सरकारमध्ये सामील झाले. यावेळी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना मंत्री करण्यात आले. या दरम्यान, आमदार सोळंके छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्यस्त होते. निवडणुकीत त्यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर ते तात्काळ मुंबईला निघून गेले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्याशी संपर्क केला असल्याचे बोलले जात आहे. परंतु आ. प्रकाश सोळंके यांनी अद्याप कोणासोबत जायचे हे ठरवल नाही. ते अजित पवार सोबत जाऊ शकतात असे राष्ट्रवादीच्या गोटातून बोलले जात आहे.
मंत्रीपद, पुढील तिकीटाची हमीया पार्श्वभूमीवर आज सकाळी आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, आ. प्रकाश सोळंके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी अजित पवार यांना मंत्री पद, आगामी माजलगाव विधानसभेसाठी तिकीटाची हमी अशा अटी ठेवल्या आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री पवारांकडून कोणता शब्द मिळतो यावर आमदार सोळंके निर्णय जाहीर करतील, असेही त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.