औरंगाबाद : पावसाळा तोंडावर आला आहे. संभाव्य जलजन्य आजार, साथरोग व पूर परिस्थितीमध्ये नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, पुढील चार महिन्यांत नागरिकांना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली.
यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खतगावकर म्हणाले की, पावसाळ्यात उद्भवणारे साथरोग, जलजन्य आजार आणि पुरामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांवर त्वरित उपचार करण्यासाठी जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष सुरू केले आहेत. दुर्दैवाने एखाद्या वेळी पूर परिस्थिती उद्भवली किंवा कुठे साथ पसरली, तर नियंत्रण कक्षातून तात्काळ उपाययोजना केल्या जातील. यासाठी मुबलक औषधी साठाही ठेवण्यात आला आहे. जिल्हास्तरीय व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांमध्ये शीघ्र प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत.
जिल्हास्तरीय पथकांमध्ये ८ तज्ज्ञ डॉक्टर्स सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असतील. प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्रांमध्ये औषधांच्या कीट ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातही औषधांचे कीट राखीव ठेवण्यात आले आहेत. कीटमध्ये सलाईन, जलक्षार संजीवनीची पाकिटे, प्रतिजैविके, ताप, सर्दी, खोकला, साथरोग, अतिसारावरील औषधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात पैठण, वैजापूर आणि गंगापूर या तीन तालुक्यांतील ३९ गावे पूर परिस्थितीने बाधित होतील. याशिवाय पावसाळ्यात उद्भवणारे जलजन्य आजार व साथरोगांमुळे बाधित होणारी औरंगाबाद तालुक्यातील ६ गावे, पैठण तालुक्यातील २२ गावे, गंगापूर तालुक्यातील १९ गावे, वैजापूर तालुक्यातील २७ गावे, सिल्लोड तालुक्यातील १५ गावे, खुलताबाद तालुक्यातील ८ गावे, कन्नड तालुक्यातील २० गावे, सोयगाव तालुक्यातील ४ गावे आणि फुलंब्री तालुक्यातील ८ गावे, अशी एकूण १२९ गावे निश्चित केली असून, या गावांंतील बाधित नागरिकांना तात्काळ औषधोपचार करण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क राहील.
डॉक्टरांचे नाव व मोबाईल नंबरया संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी सांगितले की, आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत डॉक्टरांसोबत संवाद साधण्यासाठी शीघ्र प्रतिसाद पथकांतील डॉक्टरांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतची नावे व मोबाईल नंबर असलेल्या याद्या ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, तसेच या आरोग्य केंद्रांतर्गत सर्व उपकेंद्रांच्या ठिकाणी लावल्या जाणार आहेत. फोनवर माहिती मिळताच डॉक्टरांचे पथक त्या ठिकाणी तात्काळ पोहोचू शकेल.