कन्नड : तालुक्यातील १३८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण २९ जानेवारी रोजी काढण्यात आले. आता सरपंचपदाची निवडणूक ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यादृष्टीने निवडणूक विभागाची तयारी सुरू झाली आहे. मात्र, काही गावांमध्ये बहुमत मिळूनही विजयी पॅनलकडे आरक्षण निघालेला उमेदवार नसल्याने गोची झाली आहे, तर विरोधी पॅनलच्या गोटात कमी जागा मिळूनही सरपंचपदाचा हुकमी एक्का असल्याने आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे ‘दांडा एकाचा, तर झेंडा दुसऱ्याचा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
तालुक्यात सरपंचपद आरक्षित असलेल्या ग्रामपंचायतच्या सदस्यांमध्ये सध्या नाराजीचे वातावरण आहे. आरक्षण प्रवर्गातील उमेदवारच सरपंच होणार असल्याने आता सरपंचपदाच्या उमेदवारांनी दुधाची तहान ताकावर भागविण्याच्या उद्देशाने आता उपसरपंचपदासाठी मोर्चेबांधणी करणे सुरू केली आहे. अनेक गावांत विजयी पॅनलकडे आरक्षण प्रवर्गातील उमेदवार नसल्याने विरोधी पॅनलकडे सरपंचपद जात आहे. विशेष म्हणजे हे आरक्षण पाच वर्षांसाठी असल्याने त्यांना हातावर हात धरून बसण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नाही. गावातील दिग्गजांची आता उपसरपंचपद मिळविण्याच्या धडपडीवर सोशल मीडियावर अनेक मजेशीर जोक व्हायरल होत आहेत.