Flash Back : इंदिरा लाटेने विरोधक चारीमुंड्या चीत; औरंगाबादकरांचे पालोदकरांना छप्पर फाडके मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 03:48 PM2019-04-07T15:48:48+5:302019-04-07T15:50:34+5:30
लोकसभेची पाचच्या निवडणूकीत गरिबी हटावची घोषणा
- शांतीलाल गायकवाड
औरंगाबाद : चौथ्या लोकसभेत दोलायमान झालेल्या काँग्रेस पक्षाने पाचव्या निवडणुकीत ताकदीने पुनरागमन केले. इंदिरा गांधी यांच्या ‘गरिबी हटाव’या लोकप्रिय घोषणेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मतदारांनी काँग्रेसचे उमेदवार माणिकदादा पालोदकर यांना १ लाख ९४ हजार ९२६ एवढे छप्पर फाडके मतदान केले. भारतीय जनसंघाचे रामभाऊ एकनाथ गावंडे यांच्यासह मिळून सर्व ५ उमेदवारांना ७२ हजार ३१४ मते पडली व ४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.
१९६९ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी व पक्षश्रेष्ठी मोरारजी देसाई यांच्यात श्रेष्ठत्वावरून जुंपली व त्याचे पर्यवसान मोरारजींनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाच काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात झाले. काँग्रेसचे दोन गट प्रतिस्पर्धी होऊन १९७१ च्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील गटाने जनसंघासह अन्य विरोधी पक्षांना सोबत घेतले होते. औरंगाबादेत जनसंघाने रामभाऊ एकनाथ गावंडे यांना उमेदवारी दिली होती.
६ रिंगणात; चौघांचे डिपॉझिट जप्त
५ लाख ३० हजार ९२६ एकूण मतदारसंख्या असलेल्या लोकसभा मतदारसंघातून १० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील चौघांनी परत घेतले. त्यामुळे माणिकराव पालोदकर (काँग्रेस आय), रामभाऊ गावंडे (भारतीय जनसंघ), बाळासाहेब शिवराम मोरे (रिपब्लिकन पार्टी - खोब्रागडे गट), मोहंमद जफर खान बाहाबर खान, कान्हीराम रुदयलाल बठोड आणि सय्यद कासीम सय्यद सजन हे तिघे अपक्ष रिंगणात होते. च्२ लाख ७९ हजार ३९० एवढे (५२.६२ टक्के) मतदान झाले. त्यातील पालोदकर यांनी १ लाख ९४ हजार ९२६ (७२.९४ टक्के) मतदान प्राप्त केले. गावंडे यांना ४७ हजार १५ (१७.५९ टक्के), मोरे -११ हजार ३९८ (४.२७ टक्के), खान -१० हजार ६३८, बठोड- २ हजार १४६ आणि सय्यद कासीम यांना १,११७ एवढे मते पडली. गावंडे वगळता सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
मराठवाड्यासह महाराष्ट्रात लाट
महाराष्ट्रातील ४५ जागांपैकी ४२ जागा काँग्रेस (आय)ने हस्तगत केल्या होत्या. मराठवाड्यातील सर्व सात जागांचा त्यात समावेश आहे. देशात काँग्रेसने पुन्हा ३५२ जागा पटकावताना ४३.६८ टक्के मतदानही घेतले.
माणिकराव पालोदकर यांचा अल्प परिचय
माणिकराव सांडू (पाटील) पालोदरकर यांचा जन्म पालोद (ता. सिल्लोड) मध्ये झाला. कृषी व सहकारमध्ये ते अग्रणी होते. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, तालुका सहकारी देखरेख संघाचे संचालक, जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्थेचे संचालक, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, सिल्लोडचे चेअरमन, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदी पदे त्यांनी भूषविली. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा दीर्घकाळ वावर व छाप होती.